पिंपरी : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पिंपरी येथील ‘हॉटेल नमस्कार’ येथे पत्रकार परिषद घेऊन स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले आणि पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट केली.
मुस्लिम समाज व कार्यकर्त्यांशी संवाद
या दौऱ्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शहरातील मुस्लिम समाजातील प्रमुख मौलवी, नेते, विचारवंत आणि कार्यकर्त्यांसोबत पत्रकार परिषद पार पडली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला भक्कम साथ देण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. “वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांवरून सत्ताधारी आणि प्रशासनावर निशाणा साधला. शहराचा विकास करताना सामान्य नागरिक केंद्रस्थानी असायला हवा, असे मत त्यांनी मांडले. काही जिल्ह्यांमध्ये उमेदवारी जाहीर होण्यास सुरुवात झाली असल्याने, पिंपरी-चिंचवडमध्येही लवकरच पक्षाची अधिकृत भूमिका आणि उमेदवार स्पष्ट होतील, असे संकेत या दौऱ्यातून मिळाले आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरी येथील पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड विकासासाठी पुढील मुद्दे समोर मांडले –
१) SRA विरोधात नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला होता. SRA योजना राबवली जाते, मात्र नागरिकांना महिन्याचे भाडे दिले जात नाही. SRA अधिकाऱ्यांनी अद्याप भाड्याची रक्कम किती असावी हे निश्चित केलेले नाही.
२) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले, तर SRA संदर्भात ठराव करून SRA बिल्डिंगला परवानगी देण्याचा अधिकार महानगरपालिकेकडे ठेवण्यात येईल.
३) महिन्याला ₹15,000 भाड्याचा करारनामा SRA बिल्डरांनी दिल्यानंतरच त्यांना परवानगी देण्याचा ठराव करण्यात येईल.
४) प्रस्थापित राजकीय पक्ष हे बिल्डरांचे पक्ष आहेत. त्यामुळे झोपडपट्टीधारकांना ₹15,000 भाडे मिळावे, हा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात कुठेही दिसत नाही.
५) झोपडपट्टीधारकांना जर ₹15,000 मासिक भाडे अपेक्षित असेल, तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला साद घातल्याने शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





