मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक शेवटच्या भाषणानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज “संविधान सन्मान महासभा” मुंबईत होणार आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या चेतावण्या, राष्ट्राची सर्वोच्चता, सामाजिक लोकशाहीची अनिवार्यता आणि संविधानावरील निष्ठा, आजच्या परिस्थितीत अधिकच महत्त्वाच्या ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज, २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ही महासभा होणार आहे. सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि संविधान बचावाच्या दिशेने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व चर्चा या कार्यक्रमात होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संविधानप्रेमी जनता, फुले–शाहू–आंबेडकर विचारांचे अनुयायी आणि सर्व लोकशाहीवादी नागरिकांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
महासभेला उपस्थित राहणारे मान्यवर :
१) जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी (बंगलोर)
२) विजयाबाई सूर्यवंशी – शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री
३) भन्ते राजज्योती (बुलढाणा)
४) मौलाना डॉ. अब्दुर रशीद मदणी – सदस्य, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
५) ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर बंडगर महाराज – भोजलिंग महाराज घिरडीकर मठ, पंढरपूर
याशिवाय वंचित बहुजन आघाडीची राज्य व केंद्रीय कार्यकारिणी, विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने संविधानप्रेमी नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे.
संविधान मूल्यांची जपणूक, सामाजिक न्याय आणि लोकशाहीची मजबुती यासाठी आयोजित ही महासभा सर्व समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणारी ठरणार असून, या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने जनसागर उपस्थित राहणार आहे.





