पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. ‘वरातीमागे घोडं’ अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती असून, ज्यावेळी ईव्हीएमविरोधात लढण्याची खरी गरज होती, त्यावेळी कोणीच पुढे आले नाही, असे ते म्हणाले.
आता ओरड करण्याऐवजी योग्य वेळी पावले उचलणे आवश्यक होते, असा टोला त्यांनी लगावला. आंबेडकर यांनी या दोन्ही पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. सामान्य जनतेची दिशाभूल करू नका. जिथे लढायला पाहिजे तिथे तुम्ही लढत नाही, असे ते म्हणाले. पाकिस्तानला पाच तुकड्यांमध्ये विभागण्याची संधी असताना काँग्रेसने युद्ध का थांबवले, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तीच भूमिका काँग्रेस आजही घेत आहे, असे त्यांनी म्हटले.
शरद पवार यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत दोन अज्ञात व्यक्तींची एंट्री झाल्याच्या वृत्तावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार दोन लोकांना घेऊन राहुल गांधींकडे गेले, त्यांची नोंद राहुल गांधींच्या घरी असणार आहे. शरद पवारांसोबतची ती दोन माणसे कोण होती, त्यांची नावे जाहीर करा.
सामान्य माणसाला फसवू नका, असे आवाहन करत त्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला. ईव्हीएमबाबत आपण २००४ पासून धोक्याची सूचना देत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
ईव्हीएम आणि निवडणूक आयोग
निवडणूक आयोगावर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, ‘इलेक्शन कमिशन स्वतः मूर्ख आहे.’ निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी आपण पत्र दिले होते, पण त्यावेळी कोणीही सोबत आले नाही. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे त्यांनी सांगितले.
’इंडिया’ आघाडीने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करताना, तुमचा लढा खरा असेल आणि तुम्ही पंतप्रधान मोदींना घाबरत नसाल तर तुम्ही यात नक्की सहभागी व्हा, असे त्यांनी आव्हान दिले.
’एक नागनाथ, दुसरा साधनाग’
शरद पवार यांनी सुरू केलेल्या ‘मंडल’ यात्रेवरही आंबेडकरांनी हल्लाबोल केला. ही यात्रा ओबीसींच्या कल्याणासाठी नसून त्यामागे राजकीय हेतू आहे, असा आरोप त्यांनी केला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता.
श्रीमंत मराठे हे राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार आहेत आणि त्यांच्या विरोधात ओबीसी जाऊ नये, हाच या यात्रेमागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले. भाजपकडे झुकलेला ओबीसी आता पुन्हा विचार करत आहे. एक नागनाथ आहे आणि दुसरा साधनाग आहे, अशी उपरोधिक टीका करत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकारणावर निशाणा साधला.
निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर
अॅड. प्रकाश आंबेडकरांचे विरोधी पक्षांना आवाहन: ' ७६ लाख मतदानाच्या वाढीविरोधातील याचिकेत सहभागी व्हा'मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड....
Read moreDetails