मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभाची तोडफोड झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
त्यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून या घटनेवर भाष्य करताना, हे राष्ट्रीय चिन्ह सर्व भारतीयांचे असून, अशा कृतींमुळे मुस्लीम समाज देशात स्वतःला वेगळं पाडत असल्याचं म्हटलं आहे. तसेच ॲड. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “मी श्रीनगरमध्ये भारताचं राष्ट्रीय चिन्ह – अशोक स्तंभ – तोडल्याची तीव्र निंदा करतो. राष्ट्रीय चिन्ह हे भारतातील सर्व नागरिकांसाठी आहे; ते एखाद्या व्यक्ती किंवा गटाचं नाही तर संपूर्ण राष्ट्र आणि तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं!”
त्याचप्रमाणे या घटनेला पाठिंबा देणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका आहे. “अशा प्रकारे राष्ट्रीय चिन्हाची तोडफोड करून आणि त्याला पाठिंबा देऊन, मुस्लीम स्वतःला आणि संपूर्ण समाजाला भारतात वेगळं पाडत आहेत,” असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.
ॲड. आंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला. “मुस्लिमांनी हे समजून घेतलं पाहिजे की, भारत दार-उल-अमन आहे, दार-उल-इस्लाम नाही!” या वाक्याद्वारे त्यांनी भारताची ओळख शांतताप्रिय राष्ट्र अशी आहे, धार्मिक राष्ट्र नाही, यावर भर दिला आहे.