अकोला : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपले मत नोंदवले. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

“आता जनताच नेत्यांना धडा शिकवत आहे”
मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर आणि मतदारांच्या जागरूकतेवर भाष्य केले. ते म्हणाले की, “सध्याच्या निवडणुकीत एक सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. आता नागरिकच नेत्यांना सुधारत असून त्यांना धडाही शिकवत आहेत.”

पुढे ते म्हणाले, ज्या ठिकाणी प्रस्थापितांकडून पैसे वाटण्याचे प्रयत्न झाले, तिथे जागरूक नागरिकांनी त्यांना हाकलून लावले आहे.
सरसकट पैसे वाटण्याच्या प्रकारांना आता जनतेकडून विरोध होत आहे. काही ठिकाणी वाटण्यात आलेल्या साड्या ते महिलानी जाळल्या, तर पैसे घेऊन आलेल्यांना पिटाळून लावले. हे लोकशाहीसाठी सुचिन्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. निवडणुकीच्या प्रचारात मूळ मुद्दे भरकटवण्याचे कितीही प्रयत्न झाले असले, तरी मतदारांनी त्याला बळी न पडता स्थानिक प्रश्नांना महत्त्व दिले असल्याचे त्यांनी सांगितले. “ज्यांनी स्थानिक प्रश्न आणि विकासाचे मुद्दे मांडले, त्यांनाच मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,” असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत असल्याचे मत प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले.






