पंढरपूर : देशात सर्वाधिक डाळिंब निर्यात करणाऱ्या पंढरपूरजवळील सांगोला तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे निर्यातक्षम डाळिंबाच्या बागांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी मोठ्या संकटात आहेत. नुकसानीचा प्राथमिक अंदाज तब्बल १ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे!
डाळिंब बागांना मोठा तडाखा
सांगोला तालुका हा इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, बांगलादेश, चीन, नेपाळ अशा अनेक देशांत हजारो टन डाळिंबाची निर्यात करतो. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या निर्यातीतून होते. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी तर १०० वर्षांच्या इतिहासात कधी झाला नाही असा, १६० ते १७० मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस एकाच दिवसात कोसळला.
या महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. यात परदेशात पाठवण्यासाठी तयार असलेल्या बागांचाही समावेश आहे. याशिवाय, तेल्या, मर, खोडकिड यांसारख्या किड-रोगांनीही डाळिंब बागांवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आहे.
कडलास, सोनंद, अकोला, जवळा, मंगेवाडी या भागांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यात गेली असून, त्यात ३० हजार हेक्टरवरील डाळिंब बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत आले आहेत. या प्रचंड नुकसानीमुळे सांगोल्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.