श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावात मातंग समाजाच्या महिला सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांचा मुलगा थोडक्यात बचावला असून, हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी जाळून खाक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान सरपंच मीनाक्षी सकट आणि त्यांचा मुलगा सार्थक दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर पेट्रोल हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्यांची दुचाकी आणि त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली, तर सरपंच मीनाक्षी सकट यांची साडी जळून त्यांचे पाय भाजले आहेत. त्यांचा मुलगा सार्थक प्रसंगावधान राखत तिथून पळून गेल्याने त्याचा जीव वाचला, मात्र त्याला मार लागला आहे.या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत शरद लाटे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा (क्र. ०७७५/२०२५) दाखल केला आहे.
पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसून, या घटनेचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडीने आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.काही दिवसांपूर्वी ग्रामसभेत मीनाक्षी सकट यांना जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित करण्यात आले होते. तसेच, त्यांच्या वडिलोपार्जित जागेतील अतिक्रमणाविरोधात कारवाई केल्याने आरोपींनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याआधी संदीप वागस्कर, विलास वागस्कर आणि शरद लाटे यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच रागातून आरोपींनी हा हल्ला केल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही अशा प्रकारे एका लोकप्रतिनिधी महिलेवर हल्ला झाल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे.