सांगली : भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून रुजू झालेले सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे सुपुत्र अथर्व संभाजी कुंभार (वय २४) यांना प्रशिक्षणार्थी असतानाच वीरमरण आले. बिहारमधील गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण सुरू असताना, २० किलोमीटर धावण्याच्या अंतिम टप्प्यात त्यांना उष्माघाताचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
अथर्व यांच्या निधनाने पलूससह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून देशसेवेचे स्वप्न२२ ऑगस्ट १९९९ रोजी जन्मलेले अथर्व कुंभार यांनी किर्लोस्करवाडीतील किर्लोस्कर हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले होते.
त्यानंतर त्यांनी आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. विशेष म्हणजे, इन्फोसिस सारख्या नामांकित आयटी कंपनीत दोन वर्षे नोकरी केल्यानंतर, त्या नोकरीचा त्याग करून त्यांनी सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या या निर्णयामागे देशसेवेची तीव्र इच्छा होती. अथर्व यांची थेट लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती आणि तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले होते.शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोपअथर्व कुंभार यांच्या आकस्मिक निधनाने कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि दोन चुलते असा परिवार आहे. बिहारहून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पलूस येथे आणण्यात आले.त्यांच्या घरापासून मुख्य बाजारपेठ, जुना बस स्थानक, नवीन बस स्थानक या मार्गावरून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी, भारत माता की जय!, वीर जवान तुझे सलाम! अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हजारो ग्रामस्थांनी आपल्या भूमिपुत्राला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप दिला. अथर्व यांनी अल्पावधीतच मिळवलेले लेफ्टनंट पद आणि देशसेवेचे त्यांचे स्वप्न असे अर्धवटच राहिल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.