चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हाअंतर्गत जिल्हा, तालुका व शहर पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर येथे झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा निरीक्षक राजेश बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य प्रशिक्षक वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सर्वजित बनसोडे, राज्य प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक बांधणी, पक्षांच्या ध्येयधोरणाचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा, निवडणूक प्रचार करताना मतदार संपर्क, मीडियाद्वारे प्रचार याबाबत सखोल माहिती दिली. या वेळी पंधरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कार्याचा आढावा आणि समस्याविषयी माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने, जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, महानगर अध्यक्ष बंडूभाऊ ठेंगरे, महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे, महानगर महिला अध्यक्षा तनुजा रायपुरे, युवा जिलाध्यक्ष शुभम मंडपे, वर्धा जिल्हा प्रभारी बंडू नगराळे आदी उपस्थित होते. शिबिराचे संचालन जयदीप खोब्रागडे यांनी केले. ॲड. अक्षय लोहकरे यांनी प्रास्ताविक केले.