औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत असताना, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णायक लढ्यात ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यासाठी, शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी, औरंगाबाद येथे आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून धगधगत असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून स्थान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अंतर्गत, मुख्यमंत्री फडणवीस सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा विभागात ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला धोका! –
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या सरकारी निर्णयावर कठोर टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर ट्विट करून म्हटले आहे की, हा निर्णय प्रत्यक्षात असंवैधानिक असून ओबीसी आणि भटके विमुक्त समाजावर अन्याय करणारा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, पण ते ओबीसींच्या आरक्षणाचे ताट वेगळे ठेवून द्यावे, ही त्यांची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.
२ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दिलेल्या आरक्षणावर गदा आणणारा आहे. हे आरक्षण वाचवण्यासाठी आता संघटित ताकद उभी करण्याची वेळ आली आहे.
उद्याच्या या बैठकीसाठी छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके यांना ही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
बैठकीत पुढील दिशा ठरणार ―
या पार्श्वभूमीवर, ओबीसी आणि भटके विमुक्त आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठीची बैठक उद्या, भानुदास नाट्यगृह, रेल्वे स्टेशन रोड, एस.एस.सी. बोर्डाजवळ, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मराठवाड्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाजातील सामाजिक संघटनांचे प्रमुख, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची विनंती मान्य केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे की, सध्याची परिस्थिती अतिशय नाजूक असून, सर्व ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाने आरक्षण वाचवण्याच्या लढ्यात एकत्र येणे आवश्यक आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, आरक्षणाच्या रक्षणासाठी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.