पक्षाच्या अधिकृत मीडिया हॅंडलवर दिली माहिती
अकोला : वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वीच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली होती. आता वंचितकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी २ मुस्लिम उमेदवारांना, तर एक जैन समाजातील उमेदवाराला वंचितच्या जागेवरुन लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. यामध्ये मुंबई उत्तर-मध्यमधून अबुल हसन खान, धुळ्यातून अब्दुल रहेमान आणि हातकणंगलेतून दादासाहेब चवगोंडा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही माहिती पक्षाच्या वतीने त्यांच्या मीडिया हॅंडलवर देण्यात आली आहे.
ॲड. आंबेडकर यांनी मविआला दिलेल्या प्रस्तावात ३ मुस्लिमांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. तसेच, त्यांची भूमिका सर्वच जाती-धर्मातील उमेदवारांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली पाहिजे अशी राहिली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा शब्द खरा करत ३ अल्पसंख्यांकांना उमेदवारी दिल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत निकाल वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने लागण्याची शक्यता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
तसेच, पहिली यादी जाहीर केली, त्यादिवशी आंबेडकर यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लीम यांची नवीन वाटचाल आहे असे आम्ही मानतो. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.