नवाब मलिक व NCP चे मुस्लिम आरक्षणाबद्दल मत ही RSS ची भूमिका. मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असल्याची बाळासाहेब आंबेडकरांची टीका.
मुस्लिम आरक्षणामुळे ५०% मर्यादा ओलांडली जात असल्याची नवाब मलिक यांची भूमिका.
नागपूर : नागपूर येथे २६.१२.२०२१ रोजी पत्रकार परिषदेला बाळासाहेब आंबेडकरांनी संबोधीत केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात मांडलेल्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केले.
मुस्लिम आणी मराठा आरक्षण एकाच वेळी जाहीर झाले होते. मुंबई उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल झाली असता, ती याचिका फेटाळली गेली व दोन्ही आरक्षण कायम राहिले. पुढे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर मराठा आरक्षण स्थगित करण्यात आले, परंतु मुस्लिम आरक्षणावर कोणतीही स्थगिती आली नाही. असे असूनही राज्य सरकार मुस्लिम समाजाचे ५% आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे.
मुस्लिम आरक्षण दिले तर ५०% ची मर्यादा ओलांडली जाईल अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली होती. यावर बोलताना सर्वोच्च न्यायालालाही ५०% मर्यादेची जाणीव आहे असे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले. परंतु ५% आरक्षण दिल्याने मुस्लिम समाजात शिक्षणाचं प्रमाण वाढणार असेल तर ते दिले पाहिजे, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते कायम ठेवले असेही बाळासाहेब म्हणाले. नवाब मलिक यांची भूमिका ही RSS ची भूमिका आहे. RSS ची भूमिका सुद्धा मुसलमानांना आरक्षण मिळू नये हीच आहे. तेव्हा नवाब मलिक आणी RSS एकाच बोटीतुन प्रवास करत असल्याचे ते म्हणाले. दोघांच्या भूमिकेतील हे साम्य योगायोग आहे की विचारपूर्वक आहे असा प्रश्न विचारला असता, NCP व RSS संबंध जगजाहीर आहेत असं उत्तर त्यांनी दिलं.
उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला व सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला, त्याची अंमलबजावणी करणं घटनेच्या १४२व्या कलमाप्रमाणे शासनाला बंधनकारक आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला ५% आरक्षण लागू करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.