लातूर : लातूर ग्रामीणमधील टाका येथील रहिवासी आणि जवाहर नवोदय विद्यालयाची सहावीतील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि. १३) बाभळगाव येथे जाऊन पीडित पाटोळे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
या भेटीदरम्यान ॲड. आंबेडकर यांनी कुटुंबाकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. कुटुंबावर झालेल्या अन्यायाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
“अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना रविवारी घडली. अनुष्का पाटोळे हिचा मृतदेह शाळेत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.






