नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील करंजाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग खडतर आणि जीवघेणा बनला आहे.नेसूनदीच्या पाण्यातून वाट काढत शाळेपर्यंत पोहोचणे ही त्यांच्यासाठी दररोजची अग्निपरीक्षा ठरत आहे, कारण गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असलेला पूल अजूनही रखडलेला आहे.
या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज नेसूनदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास तर परिस्थिती अधिकच बिकट होते. चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन पालक जीव धोक्यात घालून नदी पार करतात.
अनेकदा पाण्याची पातळी वाढल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच दोन-तीन दिवस मुक्काम करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होते आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.वाघेरे ते करंजाळी दरम्यान पुलाचे काम दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले होते, तरीही ते अद्याप पूर्ण झालेले नाही.
यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थ आणि पालकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या पालक आणि गावकऱ्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष असा किती दिवस सुरू राहणार? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.