मुंबई : नांदेड येथील महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या पोस्टरवर छापण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी या प्रकरणी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
अशोक चव्हाण यांच्या पोस्टरवर “रोज खा मटन आणि भाजपचं दाबा बटन. एकीकडे मटन खाऊन दुसऱ्याला मतदान अशी मनधाड करू नका” असे वक्तव्य छापण्यात आले आहे. हे वक्तव्य मतदारांच्या धार्मिक भावना दुखावणारे असून आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून निवडणूक प्रचारात मतदारांना धमकीसदृश, दिशाभूल करणारे संदेश देणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
या तक्रारीमुळे नांदेडसह राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, निवडणूक आयोग या प्रकरणावर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





