नागपूर : शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या नागपूर विभागातील ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा अंतिम प्रशासकीय चौकशी अहवाल अखेर ३१ डिसेंबर रोजी राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
या घोटाळ्यात तब्बल ६३२ शिक्षक दोषी असल्याचे निष्पन्न झाले असून, शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक आणि या प्रकरणाचे चौकशी अधिकारी महेश पालकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
राज्य सरकारने ७ ऑगस्ट रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (SIT) नेमले होते. या घोटाळ्यात सखोल चौकशीअंती ६३२ शिक्षकांनी नियमबाह्य पद्धतीने शालार्थ आयडी मिळवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात केवळ शिक्षकच नव्हे, तर शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिकारी, संस्थाचालक आणि लिपिक अशा साखळीला नागपूर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
एकीकडे महेश पालकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर झाला असताना, दुसरीकडे नागपूर पोलिसांचा तपासही वेगाने सुरू आहे. अलीकडेच यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत.






