अकोला : काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) यांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या पक्षाचा मसुदा आम्हाला दाखवावा. ज्यामुळे एकमेकांना कळतं की, आपण कोणत्या मुद्द्यावर एकत्र आहोत आणि कोणत्या मुद्द्यावर एकत्र नाहीत, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
आमचा मसुदा महाविकास आघाडीने मान्य केला आहे, त्याचे स्वागत आहे. महाविकास आघाडीने त्यांचा अंतर्गत मसुदा एकमेकांना दाखवला असेल, तो आम्हाला दाखवावा, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मसुदा आवडो न आवडो हा मुद्दा नाही. आमची पहिल्यापासून ही भूमिका आहे की, सगळे पक्ष सगळ्या प्रश्नावर एकत्र येतील असे नाही, तर कोणत्या प्रश्नावर आपण विभागलो जातोय आणि कोणत्या प्रश्नावर आपण एकत्र येतोय याची जाणीव पक्षांना असली पाहिजे. आमचा जागा वाटपाचा आराखडा अजून कोणाला गेला नाही. महाविकास आघाडीत अंतर्गत काय चालू आहे, ते आम्हाला माहिती नाही. आम्ही म्हणालो होतो की, आम्हाला तुमच्या अंतर्गत समावेश करून घ्यायचं असेल, तर ती मुभा आमची आहे आणि अधिकार त्यांचा आहे. समावेश करून घ्यायचा नसेल, तर आम्ही म्हणालो की, तुमची आधी चर्चा होऊ द्या मग आम्ही वैयक्तिकरित्या पक्षांशी चर्चा करतो. असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
निमंत्रण आले, तर बैठकीला जाणार
महाविकास आघाडीच्या 27 तारखेच्या बैठकीचे निमंत्रण अजून तरी आम्हाला आलेले नाही. निमंत्रण आले, तर आम्ही बैठकीला जाणार आहोत असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 27 तारखेअगोदर त्यांनी जागा वाटपाबाबतचा मसुदा आम्हाला सांगितला तर, पुढच्या बैठकीमध्ये निर्णय घ्यायला सोपे जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
जरांगे सर्वोच्च मराठा नेते
जरांगे पाटील हे सर्वोच्च मराठा नेते आहेत. त्यामुळे कोणीही उठावं आणि कोणीही बोलावं याला काय अर्थ नाही, त्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही. लोकांनी सहभाग घेतला, तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनात फूट पडणार नाही. लोकांनी सहभाग घेतला नाही, तर मग आपल्याला म्हणता येईल की, लोकांचा सहभाग कमी होत आहे हे त्यांनी नमूद केले.
…म्हणून सत्यपाल मलिकांवर दडपशाही
सत्यपाल मलिक यांनी पुलवामाची माहिती जनतेसमोर आणली. त्यामुळे सरकार पूर्णपणे घाबरलेलं आहे. त्यांच्याकडे अजून काही माहिती असेल, म्हणून दडपशाहीची कारवाई चालली आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. आंबेडकरांनी मलिक यांच्यावरील छापेमारीवर दिली आहे.