लातूर : रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथे मुस्लिम समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांना आमंत्रित करून बैठक आयोजित केली. या बैठकीत सलीम सय्यद यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कब्रस्तानाचा प्रश्न मांडला. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांनी हा प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन मुस्लिम समाजाची मते घेतली, मात्र सत्तेत आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने समाजात तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद म्हणाले की, “देशभरातील वंचित घटकांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर ठामपणे लढा देत आहेत. त्यांच्या आदेशानुसार सिंधगावातील मुस्लिम समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, कबरस्तानाच्या प्रश्नास आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर मांडून तो सोडविला जाईल. तसेच मुस्लिम समाजानेही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस तालुका अध्यक्ष रतन आचार्य, तालुका महासचिव विशाल मस्के, तालुका उपाध्यक्ष अहमद शेख यांच्यासह सिंधगावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.