सोलापूर : महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या प्रचाराने आता जोर धरला असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या दोन भव्य जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर आणि लातूर या दोन्ही शहरांतील राजकीय वातावरण या सभांमुळे जोरदार रंगणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने सोलापूर महानगरपालिकेसाठी आपली कंबर कसली असून, आज दुपारी ३ वाजता सोलापूरमधील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर (जुना बस डेपो) येथे पहिली जाहीर सभा होणार आहे. सुजात आंबेडकर या सभेतून तरुण मतदारांना आणि स्थानिक रहिवाशांना काय साद घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लातूर मध्ये सायंकाळी ८ वाजता ‘रणशिंग’
सोलापूरची सभा आटोपून युवा नेते सुजात आंबेडकर लातूरकडे रवाना होतील. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बौद्ध नगर) येथे त्यांची दुसरी सभा पार पडणार आहे. या सभेत ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या धोरणांवर काय टीका करतात, याबाबत उत्सुकता लागली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सुजात आंबेडकर यांच्या या झंझावाती दौऱ्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.






