बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या अपघातात अजित पवारांसह अन्य पाच जणांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.
अजित पवार यांच्या जाण्याने नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. आज सामान्य जनतेच्या डोळ्यांत अश्रू आहेत. त्यांच्या जाण्याने अजूनही विश्वास बसत नाही. “कामाचा माणूस गेला, आमचा दादा गेला” अशा शब्दांत जनता त्यांच्या कार्याची आठवण काढत आहे. आपल्या कामात ते नेहमीच चोख आणि तत्पर होते, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (Ajit Pawar plane crash)
राज्य सरकारने या दुर्दैवी घटनेनंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (२९ जानेवारी) सकाळी ११ वाजता बारामती येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गुरुवारी सकाळी ६ ते ९ वाजेच्या काळात अजित पवारांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे अंतिम दर्शनासाठी नेण्यात येईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानावर आणण्यात येणार असून, ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Ajit Pawar plane crash)
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर बारामतीत दाखल होणार आहेत.
राजकीय, सामाजिक तसेच मनोरंजन क्षेत्रातूनही त्यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया उमटली आहेत. सध्या बारामतीमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





