मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. एका हतबल शेतकऱ्याला आपले कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःची किडनी विकावी लागली. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच संताप देखील व्यक्त केला.
“गेल्या सहा महिन्यांत राज्यात ७८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे, ही आकडेवारी भयावह आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी आधीच उद्ध्वस्त झाला आहे, परंतु सरकारकडून त्यांना ना ठोस मदत मिळाली, ना संपूर्ण कर्जमाफी” असे त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
पुढे ते म्हणाले, मुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “शेतकऱ्यांनी आता आपले मत जात किंवा धर्माच्या आधारावर न देता, आपल्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. मतदानाचा पॅटर्न बदलण्याची वेळ आली असून या शेतकरी विरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचा,” असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
नेमकी घटना काय?
मिंथुर येथील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांच्याकडे ४ एकर शेती आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून उत्पन्न मिळेनासे झाले, तेव्हा त्यांनी दुग्ध व्यवसायाचा आधार घेण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० – ५० हजार कर्ज घेतले. मात्र, दुर्दैवाने विकत घेतलेल्या गाईंचा मृत्यू झाला त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला. आणि रोशन कुडे यांच्या संकटात भर पडली.
या १ लाख रुपयांवर दिवसाला १० हजार रुपये या दराने अवाजवी व्याज आकारण्यात आले. बघता बघता हे कर्ज ७४ लाखांच्या घरात गेले. सावकारांच्या सततच्या जाचामुळे कुडे यांनी आपली २ एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील वस्तू विकल्या तरीही कर्ज फेडता आले नाही. कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया अन् किडनीची विक्रीजेव्हा विकण्यासारखे काहीच उरले नाही, तेव्हा सावकाराने अत्यंत क्रूर सल्ला दिला. एजंटने यांना किडनी विकण्याचा सल्ला दिला. कुडे यांना कोलकाता येथे नेण्यात आले. तिथून त्यांना कंबोडिया येथे नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
आपली एक किडनी केवळ ८ लाख रुपयांना विकून त्यांनी सावकाराचे काही देणे पूर्ण केले. मात्र, आजही त्यांचे पूर्ण कर्ज फिटलेले नाही.
पोलीस प्रशासन आणि सरकार सुस्त?
अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी रोशन कुडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली, तक्रार दिली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सावकारांच्या दहशतीपुढे प्रशासन हतबल झाले आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
“मी माझे सर्वस्व गमावले आहे. किडनी विकूनही सावकाराचा तगादा थांबलेला नाही. जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करेन,” असा टाहो रोशन कुडे यांनी फोडला आहे.






