मुंबई: प्रबुद्ध भारत या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक पाक्षिकाच्या ‘वृत्तसंपादक’ पदाची धुरा आपल्या खांद्यावर पेलून आंबेडकरी विचार घरा – घरांत घेऊन जाण्याचा निर्धार करणारे जितरत्न पटाईत यांची वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केले.
जितरत्न पटाईत हे विदयार्थीदशेतच मालेगाव येथून पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आले असताना त्यांनी पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. येथील शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी टाटा मोटर्स येथे नोकरी देखील करत होते. आंबेडकरी विचारांना घराघरात घेऊन जाण्यासाठी 2017 मध्ये प्रबुद्ध भारतचे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने प्रबुद्ध भारतच्या उपसंपादक तथा वृत्तसंपादक पदी त्यांनी कार्य सुरू केले आणि प्रबुद्ध भारतला पुन्हा जिवंत करण्याचे कार्य केले.
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष राज्यातील वास्तविक प्रश्नांवर लक्ष वेधत आहे. अन्यायग्रस्तांना न्याय द्यायचे कार्य करत आहे. अशावेळी सध्याच्या काळात समाज माध्यम खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणून पक्षाने जितरत्न पटाईत यांच्यासारख्या तडफदार युवकाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली. त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस ‘प्रबुद्ध भारत’ मीडिया टीम कडून मनःपूर्वक शुभेच्छा.