गावगाड्याच्या आगीत होरपळत,
दारिद्र पुजत, वाहत होतो आयुष्याची प्रेतं.
चावडी, महारवाड्याच्या पलिकडे नव्हतं अस्तित्व,
झालं नव्हतं कधीच सिमोल्लंघन जातीच्या
दळभद्री चौकटीतून.
फेडत होतो मरीआईचा नवस,
म्हसोबाला नारळ,
कुण्या फकीराचे अंगारे-घुपारे चोपडत,
गुलाल भंडारे उधळत
सडत होतो गावकुसाबाहेर.
विज्ञान कशासोबत खातात नव्हता पत्ता,
प्रतिष्ठा, स्वाभिमान याचा नव्हता मागमूस,
जातीने बांधलेल्या साखळदंडाला
ऐवज मानत अजून जोरात
आवळत होतो सर्वांगाला.
पण जेव्हा तु उभा ठाकलास दंड थोपटून
पाण्याला आग लावत,
चातुर्वर्णाचे इमले ढासळवत,
जातिय घार्मिक वर्गिय विकृतीचे कळस मोडत,
गुलामीचे साखळदंड तोडत,
उच-निचतेचे मनोरे भेदत,
तेव्हा तु मला आभाळाहुन उंच वाटत आलायेस.
जोखडातून मुक्त करत,
गावकुसाबाहेरुन काढत, दिलंस हक्काच स्थान
गाववेशीपासून संसदेपर्यंत.
स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा जयघोष करत
तु हाती दिलास बुद्ध, दाखविलास सन्मार्ग
सम्यक संबुद्धांचा.
शोषितांच्या दबलेल्या नरड्याला
बुलंद आवाज देत तु ठरलास
शुद्ध स्वच्छ ऑक्सिजन,
यापुढेही येणार्या शेकडो पिढ्यांना
हा ज्वलंत ऑक्सिजन
कायमच देत राहील अफाट बळ
कायमच देत राहील अफाट बळ…
- सचिन आनंदराव तुपेरे
- १३-०४-२०२२