Dr Eknath Vasant Chitnis : भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाला आपल्या संपूर्ण आयुष्याने समृद्ध करणारे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी नुकताच आपला १०० वा वाढदिवस साजरा केला होता. मात्र, प्रदीर्घ आजारानंतर २२ ऑक्टोबरच्या सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारताच्या अंतराळ क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
इस्रोच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा:
डॉ. चिटणीस हे भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या वैज्ञानिकांपैकी एक होते. त्यांनी ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती’ (INCOSPAR) मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, याच समितीचे रूपांतर पुढे ‘इस्रो’मध्ये झाले. चांद्रयान, मंगलयान यांसारख्या यशस्वी मोहिमांमधून इस्रोने आपला दबदबा निर्माण केला आहे. डॉ. चिटणीस यांनी या प्रतिष्ठित संस्थेच्या स्थापनेतही महत्त्वाचे योगदान दिले.
थुम्बा लॉन्चपॅड ते स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटरचे नेतृत्त्व:
केरळ येथील थुम्बा (Thumba) या महत्त्वपूर्ण लॉन्चपॅडच्या निवडीसाठी डॉ. चिटणीस यांचे मोठे योगदान होते. आजही थुम्बा हे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यांनी सखोल अभ्यास करून या ठिकाणाची निवड केली होती. तसेच, १९८१ ते १९८५ या काळात त्यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील इस्रोच्या ‘स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर’ (SAC) चे नेतृत्त्व केले. या केंद्रात उपग्रह आणि अंतराळ तंत्रज्ञानावर कार्य केले जाते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने अनेक महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या.
डॉ. साराभाईंचे सहकारी, डॉ. कलामांचे गुरू:
भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक मानले जाणारे डॉ. विक्रम साराभाई यांचे डॉ. चिटणीस हे निकटचे सहकारी होते. डॉ. साराभाई यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाला पुढे नेण्यास मदत केली. विशेष म्हणजे, ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनाही डॉ. चिटणीस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.देशाच्या या सर्वोच्च योगदानाबद्दल त्यांना ‘पद्म भूषण’ या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.