पुणे :मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? आणि आरएसएस फक्त प्रेक्षक बनला आहे का? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
हिंदी महासागरात आपला प्रभाव जोमाने वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाणीवपूर्वक मालदीवला चीन आणि चीनसोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची परवानगी दिली होती का? कारण भाजपला चीनकडून पक्षासाठी देणगी मिळाल्यामुळे ? असे प्रश्न ही आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.
भारतासोबतच्या राजनैतिक वादाच्या दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी गुरुवारी (11 जानेवारी) बीजिंगमध्ये त्यांच्या पहिल्या चीन भेटीदरम्यान मालदीवच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य हस्तक्षेपाचा तीव्र विरोध करेल आणि बेट राष्ट्रांच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य राखण्यास पाठिंबा देत आहोत, असे म्हटले आहे.
मुइझू यांची चिनी नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ‘दोन्ही बाजू त्यांच्या मूळ हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना जोरदार पाठिंबा देण्यास सहमत आहेत.’ मालदीवने चीनला बेट राष्ट्रात अधिक पर्यटक पाठवण्याच्या ‘वेगवान’ प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्याची विनंती केली होती. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी बुधवारी (10 जानेवारी) त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली. यानंतर दोन्ही देशांमध्ये 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हे ट्विट केले आहे.