धर्माधारित राजकारणाने भारत एकटा पडला : ॲड. प्रकाश आंबेडकर
पिंपरी चिंचवड : वंचित बहुजन आघाडीच्या एक संधी वंचितला निर्धार सभेत राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्विकास आणि देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली.
सभेला उपस्थित नागरिकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांचे मत चोरी झाले असा आरोप करता येत नाही; खरी समस्या बूथवरील अधिकाऱ्यांकडून सत्ताधारी पक्षासाठी मोठ्या प्रमाणावर मते टाकली जाण्यात आहे. निवडणूक प्रक्रियेतील ही गंभीर अनियमितता लोकशाहीला घातक असल्याचे त्यांनी म्हटले.

पिंपरी चिंचवडमधील मुस्लिम झोपडपट्टीवासीयांवर टार्गेट करून अन्याय्य कारवाई होत असून तब्बल वीस हजार कुटुंबांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. झोपडपट्टीधारकांना संधी देण्याची आणि त्यांचे प्रतिनिधित्व सभागृहात पोहोचवण्याची वेळ आल्याचे सांगत, “उभे राहणाऱ्या झोपडपट्टी धारकाला वंचित बहुजन आघाडी तिकीट देणारच,” असे आश्वासन त्यांनी दिले.

पुनर्वसनाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, घर मिळेपर्यंत प्रत्येक कुटुंबाला १५ हजार रुपये घरभाडे मिळालेच पाहिजे. तसेच SRA योजना राबवणाऱ्या खाजगी बिल्डराने हे भाडे देण्याचे लिखित आश्वासन दिल्याशिवाय कोणतीही परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी जोरदारपणे मांडली.

देशातील राजकीय वातावरणावर टीका करताना त्यांनी पंतप्रधान मोदींचे आणि लष्कर प्रमुखांचे चीनबाबतचे परस्परविरोधी विधान उदाहरणादाखल मांडत केंद्र सरकारच्या परराष्ट्रनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विश्वास ठेवायचा तर मी लष्कर प्रमुखांवरच ठेवेन,” असे आंबेडकर म्हणाले. धर्माधारित राजकारणामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची मित्रता कमी होत चालल्याचेही त्यांनी नमूद केले.
सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि आंबेडकर यांच्या मुद्द्यांना प्रतिसाद म्हणून घोषणाबाजीही झाली.






