मुंबई : संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छ. शिवाजी महाराज पार्क मुंबई येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर हे संबोधित करणार आहेत. संविधान सन्मान सभेच्या तयारीची पाहणी देखील युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी सहकाऱ्यांसह केली आहे.
या सभेच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून विविध धर्म, जातीचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी तसेच संविधानप्रेमी जनता उपस्थित राहणार आहेत असे सुजात आंबेडकरांनी सांगितले .यावरून या कार्यक्रमास लाखो लोक उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील घडत असणाऱ्या अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर या सभेत ॲड.प्रकाश आंबेडकर करतील. राज्यातील ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्नावरही ॲड.प्रकाश आंबेडकर स्पष्टीकरण देणार असल्याचेही सुजात आंबेडकरांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याचे सुजात आंबेडकरांनी सांगितले त्यामुळे त्यांची उपस्थिती राहणार का ? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सभेत नक्की काय घडणार ? ॲड.प्रकाश आंबेडकर काय बोलणार ? या सर्व प्रश्नांच्या उत्तराकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.