सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक सातारा येथे पार पडली.या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आणि राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुके हे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांमध्ये आघाडीच्या विजयासाठी ध्येय–धोरण, संघटनात्मक बांधणी आणि प्रभावी प्रचारयंत्रणा यांचा वापर कसा करावा, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “वंचित बहुजन आघाडीचा विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. संघटनात्मक बळ आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच परिवर्तन शक्य आहे.”बैठकीस सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





