वसई-विरार : वसई-विरारमध्ये खळबळ! सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांशी संबंधित प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. कालच सत्कार आणि समारंभाचा कार्यक्रम झालेले वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह एकूण १२ ठिकाणांवर मंगळवारी सकाळी ईडीने छापेमारी केली.
या कारवाईमुळे वसई आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, नाशिक, वसई आणि विरार येथील वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यातील बहुतांश ठिकाणी टाकलेले छापे हे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी पहाटेपासूनच ईडीने ही कारवाई सुरू केली असून, याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. एकाच वेळी १२ ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली. पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली कारवाई उशिरापर्यंत सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.