यवतमाळ : वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आयोजित भव्य ‘कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चा’ ऐतिहासिक ठरला. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. अविरत पावसातही कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती, संघर्षाची तयारी आणि निष्ठा याची स्पष्ट साक्ष ठरली.
जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे यांनी सांगितले, “हा केवळ आक्रोश नसून, निष्ठा आणि संघर्षाच्या तयारीची साक्ष आहे.” सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसातही हजारो युवा कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम फक्त राजकीय आंदोलन नव्हे तर वंचित, शोषित, आदिवासी व सर्वहारा बहुजन समाजावरील अन्यायाविरुद्धचा ऐतिहासिक एल्गार ठरला.
मेळाव्यानंतर निघालेल्या ‘आक्रोश मोर्चाचे’ नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर, तसेच शिवदास कांबळे, करुणा मून, मिलींद पाटील आणि इतर जिल्हा पदाधिकारी यांनी केले.
मोर्चा मारेगाव तहसील कार्यालयपर्यंत पोहोचला आणि प्रशासनास खालील मागण्या निवेदनाद्वारे सादर केल्या :
- महाबोधी महाविहार तात्काळ बौद्धांच्या ताब्यात द्यावे.
- शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा.
- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी.
यावेळी, जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी मुख्य आयोजक राजू निमसटकर यांच्यावर वणी विधानसभा प्रमुख आणि जिल्हा उपाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारीही सोपवली. हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे हा मोर्चा अत्यंत यशस्वी ठरला. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्याही कार्यकर्त्यांच्या मेहनतीने या आंदोलनाची यशस्वीता अधिक दृढ झाली.