आरोपी अधिकाऱ्यांवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करा
पुणे : पश्चिम हवेलीतील खडकवासला गावाजवळ, पुणे १९५८ साली भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनी ५६ गावांतील बौद्ध बांधवांना ज्या ऐतिहासिक स्थळी धम्मदिक्षा दिली होती, त्याच ऐतिहासिक जागेवरील बौद्ध विहार दोन दिवसांपूर्वी सिंचन अधिकारी गिरीजा कल्याणीकर ते यांनी पाडून टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ‘ऐतिहासिक वास्तू’च्या तोडफोडीच्या निषेधार्थ अखिल सिंहगड रोड परिसरातील बौद्ध बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन –
या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित अधिकारी गिरीजा कल्याणीकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सिंहगड रोड, पुणे येथील नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी सिंचन अधिकारी गिरीजा कल्याणीकर यांच्या कृत्याचा ‘जातीयवादी’ म्हणून निषेध केला असून, त्यांच्यावर त्वरित ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या ऐतिहासिक धार्मिक स्थळाच्या विटंबनेमुळे बौद्ध समाजात तीव्र असंतोष पसरला आहे.
आंदोलकांनी मागणी केली आहे की, अशा जातीयवादी अधिकारीला निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि पाडलेले बौद्ध विहार त्याच जागी पुन्हा उभे करावे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ऍड अरविंद तायडे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष मधुकर दुपारगुडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






