वाशीम : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रिसोड, वाशीम, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यांतील हजारो एकरवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, भाजीपाला यांसह विविध पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही शेतजमिनी खरडून गेल्या असून जनावरांना देखील धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, वाशीम जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच विशेष मदत पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांची थकलेली कर्जे माफ करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.“अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने तातडीने मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
या वेळी माजी आमदार आणि वाशीम जिल्हा निरीक्षक सैय्यद नातीकोद्दीन खतीब, फुले-आंबेडकर विद्वत्त सभेचे भास्कर भोजने, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा ज्योतीताई इंगळे, अभिजीत राठोड, जिल्हा सचिव विनोद भगत, जिल्हा महासचिव रंगनाथ धांडे, जिल्हा प्रवक्ता संदीप सावळे, जिल्हा मार्गदर्शक दत्तराव गोटे, माजी महासचिव सोनाजी इंगळे, नारायण मिटकरी, तालुका अध्यक्ष महेश तिडके (रिसोड), सारनाथ अवचार (मालेगाव), तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.