औरंगाबाद : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त औरंगाबाद येथील प्रसिद्ध बुद्ध लेणी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम दुपारी ४ वाजता सुरु होणार असून, यावेळी हजारो अनुयायांची उपस्थिती असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपूरमध्ये केलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या स्मरणार्थ दरवर्षी देशभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.
याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील बुद्ध लेणीतही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात धम्मदीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने व सामाजिक जागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.