पुणे : संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिवृत्ती प्रश्नावरून राज्यात प्रचंड असंतोष उसळला असून विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयासमोर बॅनरबाजी करत सरकारविरोधात रोष व्यक्त केला. या बॅनरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्यही झळकले होते. त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले आहे की, “सरकारने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे.
समान निकषांच्या नावाखाली फेलोशिप रोखणे योग्य नाही. संशोधक विद्यार्थ्यांना तातडीने न्याय द्यावा. जाहिराती लगेच प्रसिद्ध करून अधिवृत्ती प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा याद राखा, तुमची गाठ माझ्याशी आहे.”
बार्टी, महाज्योती आणि सारथीच्या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिवृत्ती 2023, 2024 व 2025 साठी स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाहीत. तब्बल दोन वर्षे चार महिने अधिवृत्ती प्रक्रिया रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण व संशोधन धोक्यात आले आहे. 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या छात्रवृत्ती जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने हजारो संशोधक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे.
शिक्षण थांबण्याची भीती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढत असून, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने या प्रश्नावर आपल्या अधिकृत सोशल मिडिया हॅण्डलवर सरकारविरोधात भूमिका आक्रमक केली आहे. यामुळे सर्वच संशोधक विद्यार्थ्यांना आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास निर्माण झाला आहे.