कोलकाता : जागतिक फुटबॉलचा महान खेळाडू आणि ‘GOAT’ (Greatest Of All Time) म्हणून ओळखला जाणारा लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर ‘GOAT इंडिया टूर’साठी भारतात दाखल झाला आहे. मेस्सीच्या आगमनाने कोलकातामधील फुटबॉल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. मात्र, मेस्सी आज सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाल्यावर घडलेल्या प्रकारामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप पसरला आहे.
मेस्सी आज सॉल्ट लेक स्टेडियममध्ये एका सन्मान सोहळ्यासाठी पोहोचला होता. या कार्यक्रमासाठी हजारो चाहत्यांनी तिकिटांवर मोठी रक्कम खर्च केली होती आणि आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी ते आतुर झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सीचा सन्मान सोहळा अपेक्षित वेळेपेक्षा फारच कमी वेळेत आटोपला. अवघ्या काही मिनिटांतच लिओनेल मेस्सी स्टेडियममधून बाहेर पडला.
तिकिटांवर हजारो रुपये खर्च करूनही मेस्सी काही क्षणातच निघून गेल्यामुळे चाहते संतप्त झाले. चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत त्यांनी आयोजकांबद्दल आपला रोष व्यक्त केला, ज्यामुळे काही काळ परिस्थिती हाताबाहेर गेले.






