ॲड. प्रकाश आंबेडकर : महाविकास आघाडीला वंचितने दिलेल्या मसुद्यात एमएसपीचा मुद्दा !
मुंबई : शेतकऱ्यांची मागणी रास्त असून, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र, त्यांची वाट अडवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे, हे लोकशाहीला धरून नाही. सध्या देशभर लोकशाहीची हत्या होत असल्याचे चित्र असून, दिल्लीत जमलेल्या आणि देशभरातील शेतकऱ्यांनी येत्या निवडणुकीत भाजपला सडेतोड उत्तर द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.
माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या हक्कांसाठी कोणाकडे याचना करताय? ते स्वत: लालाच्या मांडीवर बसून तुम्हाला लुटत आहेत. जर तुम्हाला तुमच्या हक्काची लढाई जिंकायची असेल, तर येत्या निवडणुकीत त्यांना सडेतोड उत्तर द्या, असे ॲड. आंबेडकरांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.एक वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जोरदार आंदोलन केले होते. या वेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करत कृषी कायदे रद्द केले. मात्र, आता पुन्हा शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. एमएसपीबाबत कायदा करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. तर, दुसरीकडे सरकार आंदोलन रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य झाल्यानंतर शेतकरी आता पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकरांनी हे ट्विट केले आहे.
या पूर्वीही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याचे ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदेशीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी अतिशय वाजवी आणि न्याय्य आहे. शेतकऱ्यांना खासगी कंपन्या आणि खरेदीदारांच्या दयेवर सोडून चालणार नाही.
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला सादर केलेल्या 39 कलमी अजेंड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत प्रमुख अजेंड्यांपैकी एक असल्याचा उल्लेख देखील त्यांनी यात केला होता.
शेतकऱ्यांना एमएसपी खात्रीशीर देण्याचे मार्ग देखील त्यांनी सांगितले होते.
1. सरकारने नेहमीपेक्षा जास्त खरेदी करावी.
2. एमएसपी आणि बाजारभाव यांच्यातील तफावत भरुन काढण्यासाठी शेतकऱ्याला तूट भरपाई दिली जाते.
3. शेतकऱ्यांची तूट भरून काढण्यासाठी सरकारने प्राइस डेफिसिट फंड तयार केला पाहिजे. जर महाराष्ट्रातील शेतकरी एमएसपीच्या मागणीसाठी असाच आंदोलन करत राहिला, तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या मागणीला मनापासून पाठिंबा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.