मुंबई : मुंबईत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत पात्र महिलांना स्वयंपूर्ण रोजगारासाठी शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्रांचे वितरण अखेर करण्यात आले आहे. या वितरणात होत असलेल्या विलंबाविरोधात वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हे वाटप शक्य झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वप्नील राजेंद्र जवळगेकर यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी मुंबई महापालिकेला अधिकृत निवेदन देऊन वाटपातील विलंबाबद्दल तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच, या वाटप कार्यक्रमात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती.
जर खासदार, आमदार किंवा माजी नगरसेवकांनी यात हस्तक्षेप केला तर आंदोलन करून वाटप थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.या दबावामुळे अखेर आज कुर्ला नेहरू नगर येथे मुंबई महानगरपालिका ‘एल’ विभागाच्या वतीने पात्र महिलांना ही यंत्रसामुग्री वितरित करण्यात आली.
विशेष म्हणजे, काही अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी आमदार मंगेश कुडाळकर यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामुळे आमदार कुडाळकर कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. यामुळे हा कार्यक्रम पूर्णपणे राजकारणमुक्त आणि पारदर्शक पार पडला.या यशस्वी वाटपानंतर लाभार्थी महिलांनी वंचित बहुजन आघाडी आणि स्वप्नील जवळगेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. “महिलांच्या हक्काचा हा विजय म्हणजे वंचितांच्या संघर्षाचे फलित आहे,” अशा भावना महिलांनी यावेळी व्यक्त केल्या.