सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल !
परभणी : सोमनाथच्या मारेकर्यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? असे विचारत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का? असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयबाई व भाऊ अविनाश सुर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.
ज्यांनी सोमनाथचा खून केला त्या पोलिसांना सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून त्यांना आ.धस यांची साथ असल्याचा आरोपही सोमवारी (दि.10) पत्रकार परिषदेत करण्यात आला. शहरात वंचित बुहजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसीकर, महिला जिल्हाध्यक्षा सुनिता साळवे यांची उपस्थिती होती.
नाशिक येथे लाँग मार्च आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते पोलिसांना माफ करण्यासंदर्भात वक्तव्य करत आहेत. याबाबत जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का? असा संतप्त सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने उपस्थित केला आहे.
तसेच जोपर्यंत सर्व दोषी पोलीस अधिकार्यांना शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.आ.धस यांनी मन मोठं करा आणि पोलिसांना माफ करा असे म्हटले असून त्याचा समाचार घेत विजयाबाई सुर्यवंशी म्हणाल्या की, आमचं मन छोटंच आहे, आम्ही गुन्हेगारांना अजिबात माफ करणार नाही. तुमचं चुकीचं बोलणं सहन करणार नाही. माझ्या पोटचं लेकरू गेलंं आहे. माझं लेकरू परत आणून देऊ शकता का? मी कोण्या पोलिसाला माफ करणार नाही, त्यांना मोकळं सोडणार नाही.पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि सोमनाथचे मारेकरी पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोदवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील सुर्यवंशी कुटुंबियांनी यावेळी केली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यामुळेच सत्य घटना बाहेर आल्या असून तेच आम्हाला न्याय मिळवून देतील असा विश्वास विजयाबाई सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा संवैधानिक मार्गाने सुरूच राहील असे अविनाश सुर्यवंशी यांनी सांगितले.