पुणे : भाजपचे माजी खासदार संजय दत्तात्रय काकडे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालयावर (पाषाण) गुरुवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काकडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निवेदन संबंधित पोलिस अधिकार्यांना देण्यात आले. याची दखल घेत पोलिस अधिकार्यांनी आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.तक्रारदार दीपक विश्वास कदम यांनी भाजपचे माजी खासदार संजय दत्तात्रय काकडे यांच्या विरुद्ध राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केलेली होती.
सदर आदेशानुसार कारवाई करून पोलिसांना १५ दिवसांच्या आत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगास कळविणे बाबत आदेश दिलेले आहेत. तरी संजय काकडे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध अद्याप कसलीही कायदेशीर कारवाई केलेली नाही, अशी आंदोलकांची तक्रार आहे.
दरम्यान, आठ दिवसांत कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडी पुणे शहरच्या राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दिपक कदम, ॲड. अरविंद तायडे (महासचिव पुणे शहर), भारिपचे माजी शहराध्यक्ष ॲड. किरण कदम, पुणे शहर उपाध्यक्ष अजय भाऊ भालशंकर, महासचिव ॲड. रेखाताई चौरे, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष विशाल भाऊ कसबे, राजेंद्र सोनवणे, कोमल चव्हाण. निरीक्षक हनुमंत फडके आदी शेकडो कार्यकर्ते होते.