नागपूर : ज्येष्ठ कृषी अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते अमिताभ पावडे यांचे नागपुरात एका रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. सोमवारी (१९ ऑगस्ट) संध्याकाळी नागपूरच्या धंतोली भागात भरधाव वेगाने आलेल्या बुलेटने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सामाजिक, शेतकरी आणि पर्यावरण क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
एकेकाळी एरोनॉटिक इंजिनियर म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या अमिताभ पावडे यांनी आपले पद आणि प्रतिष्ठा सोडून स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतले होते. मातीशी त्यांची नाळ इतकी घट्ट जोडली गेली होती की त्यांनी आयुष्यभर शेतकरी आणि शोषित वर्गाच्या प्रश्नांवर निस्वार्थपणे काम केले. त्यांच्या जाण्याने केवळ एका व्यक्तीचे नाही तर एका चळवळीचे काम थांबले आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
धंतोली येथील राठी हॉस्पिटलजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. अमिताभ पावडे त्यांच्या सीडी १०० दुचाकीने जात असताना, भरधाव वेगाने आलेल्या एका बुलेटने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पावडे यांना तात्काळ न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बुलेट चालकाचा शोध सुरू आहे.
समाजसेवेचा वारसा
अमिताभ पावडे यांना समाजसेवेचा वारसा त्यांचे वडील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोतीराम पावडे आणि आई कुमूद पावडे यांच्याकडून मिळाला होता. समाजात पहिली रात्रशाळा सुरू करणारे आणि विदर्भात पहिला आंतरजातीय विवाह करणारे मोतीराम पावडे यांच्या संस्कारांमुळे या कुटुंबाने नेहमीच समाजाच्या वेदना जवळून अनुभवल्या. यामुळेच, अमिताभ पावडे यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणातील कार्यकारी अभियंता पदाचा त्याग करून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला.
लोकसत्ता वृत्तपत्रासाठी त्यांनी कृषी क्षेत्रावर केलेले लेखन शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे ठरले. त्यांच्या निधनामुळे नागपूरच्या सामाजिक आणि वैचारिक वर्तुळातील एक शांत पण अत्यंत प्रभावी आवाज कायमचा शांत झाला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अमिताभ पावडे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर पोस्ट शेअर करत पावडे कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
आंबेडकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अमिताभ पावडे यांचा अपघाती मृत्यू अतिशय दुःखद आहे. कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे अभ्यासक, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेला, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आज आपल्यात नाही.
ते पुढे म्हणाले, “शोषित, वंचित, शेतकरी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यांविषयी अमिताभ पावडे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत निस्वार्थपणे काम केले.” या दुःखाच्या क्षणी आपण आणि वंचित बहुजन आघाडी कुमुदताई पावडे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत, असे सांगत ॲड. आंबेडकर यांनी त्यांना अखेरचा मानाचा जयभीम! असे म्हणून श्रद्धांजली वाहिली.