संजीव चांदोरकर
..ही अवस्था आहे देशातील क्रेडिट कार्ड धारकांची विशेषता तरुण वर्गातील. अनेक सुखवस्तू मध्यमवर्गीय क्रेडिट कार्ड वापरतात ते सोय म्हणून. म्हणजे खिशात कॅश बाळगायला नको आणि साठलेली देणी एकदम क्रेडिट कार्ड बँक/ कंपनीला ठरलेल्या दिवशी देता येतात म्हणून.
पण गेल्या काही वर्षात क्रेडिट कार्ड वापरण्याचे तत्वज्ञान बदलवले गेले आहे. “ आता क्रेडिट कार्ड वापरून मजा करू, खरेदी करू, खर्च करू आणि पैसे मिळतील तसे आणि त्यावेळी परतफेड करू” स्मार्टफोन, गृहपयोगी वस्तू खरेदी, महागडे पर्यटन, विमान प्रवास, लग्न किंवा तत्सम कौटुंबिक समारंभ क्रेडिट कार्ड वापरून झोकात साजरे केले जातात. देशात दहा कोटी पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वाटली गेली आहेत. दर महिन्याला अंदाजे दहा लाख नवी क्रेडिट कार्ड वाटली जातात. त्यापैकी ४० टक्यांपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड धारक २० ते ३० वयोगटातील आहेत.
बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या, फिनटेक कंपन्या, को ब्रॅण्डिंग करून…वेड्यासारखी क्रेडिट कार्ड वाटत सुटली आहेत. वित्तीय वर्ष २०२१ मध्ये क्रेडिट कार्ड मार्फत ६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते ते वाढून फक्त चार वर्षात वित्तवर्ष २०२५ मध्ये २५ लाख कोटी रुपयांचे झाले आहेत. आपल्या हातातील उत्पन्न किती, त्या उत्पन्नाची निश्चितता किंवा अनिश्चितता किती याचा विचार न करता क्रेडिट कार्ड वापरली जात आहेत. हे लोण अगदी जिल्हा/ तालुका पातळीपर्यंत पोहोचले आहे.
क्रेडिट कार्ड धारकांपैकी अनेक जण विविध प्रकारच्या अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. जिथे फक्त मासिक आमदनी कमी असते एवढेच नव्हे तर ती अनिश्चित देखील असते. साहजिकच क्रेडिट कार्ड मधील थकित कर्ज वाढत आहेत. वित्तवर्ष २०२० मध्ये थकीत कर्जाचा आकडा ११०० कोटी रुपयांचा होता, तो २०२५ मध्ये ७००० कोटी रुपयांवर गेला आहे. (परतफेडीच्या तारखेपासून ९० दिवसाच्या आत पेमेंट केले नाही तर त्याला थकीत कर्ज म्हटले जाते).
बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या थकीत रकमेवर ४२ टक्के ते ५६ टक्के व्याजदर लावतात. आधीचे पेमेंट केले नसेल आणि तरी देखील नवीन खरेदी केली तर त्या खरेदीवर देखील हे वाढीव व्याजदर लावले जातात. त्यामुळे पेमेंट करायच्या रकमा चक्रवाढ दराने वाढतात. विविध प्रकारच्या जाहिराती, सोशल मीडिया, आणि मुख्य म्हणजे पियर ग्रुपचे प्रेशर यामुळे कुटुंबांचे आणि विशेषतः तरुण वर्गाच्या राहणीमानाच्या / भौतिक आकांक्षा त्यांच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा काही पटीने वाढवल्या गेल्या आहेत. आणि त्या प्रमाणात त्यांच्या हातात उत्पन्नाची पुरेशी साधने मात्र दिली गेलेली नाहीत.
त्यामध्ये आमदनीची अनिश्चितता आहे. उत्पन्नाची साधने शोधणे हा नागरिकांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे काहीसे जनमानसात रुजवले गेले आहे. क्रेडिट कार्ड व्यक्तिगत कर्जाचा एक प्रकार झाला. नाना प्रकारची रिटेल कर्जे पाजली जात आहेत. म्हणून फक्त क्रेडिट कार्डमधून येणाऱ्या कर्जबाजारीपणाची सुटी चर्चा न करता समग्र रिटेल कर्ज क्षेत्र समोर ठेवले पाहिजे कर्जाच्या ओझ्याखाली राहणारा कोणीही प्रौढ कोणत्याच सामाजिक राजकीय इश्यूंवर प्रतिक्रिया देत नाही. मी, माझे आयुष्य, माझा संसार आणि माझे कर्जे, बस्स.
एवढेच त्याचे विश्व राहते. नागरिकांना आणि तरुण वर्गाला, आणि विद्यार्थ्यांना देखील, सतत कर्ज परतफेडीच्या टांगत्या तलवारीखाली आयुष्यभर जगायला लावणे हा फक्त वित्तीय किंवा आर्थिक अजेंडा नाही तर राजकीय अजेंडा देखील आहे. हे समजावून सांगणे म्हणजे राजकीय आर्थिक साक्षरता. हे सत्य नवीन फिन इन्फ्लुएन्सर्स किंवा वित्त साक्षरतेचे क्लासेस कधीही सांगणार नाहीत , त्यांनी सान्गायला सुरुवात केली की त्यांची नोकरी किंवा स्पॉन्सरशिप काढून घेतली जाईल.