–प्राचार्य डॉ धैर्यवर्धन पुंडकर
भारतात दोन वृत्ती कायम बघायला मिळतात एक उदात्त हेतू साठी धर्म जात विसरून लढा उभारणे आणि दोन तो लढा यशस्वी झाला की त्याची सत्ता आणि अधिकार मात्र बहुसंख्याक समूहाच्या हाती ठेवणे. एकदा लढा संपला की पुन्हा भेदाभेद आधारित वर्ण व्यवस्थे प्रमाणे राज्य कारभार चालवणे. याला अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य होते ज्यात शिवरायांनी वर्ण व्यवस्था बाजूला सारून शूद्रांना क्षत्रियत्व बहाल केले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वराज्यात सामील करून घेतले.
अलीकडे पुन्हा तसे होतांना दिसत आहे की स्वराज्याच्या आणि त्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांना नेहमीप्रमाणेच बाजूला करून त्यांचा शौर्याचा इतिहास दाबून आता हे सर्व आमचेच आहे अशी वृत्ती प्रखरपणे समोर आलेली आहे.
वर्तमान हिंदुत्ववादी राजकारणातील ऐतिहासिक विकृतींकडे सध्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या २०० व्या वर्धापनदिनानिमित्त घडलेल्या राजकीय घटनांमुळे जसे हे प्रकाशात आले आहे तसे शिवकालीन इतिहास नव्याने मांडणी होतांना देखील दिसत आहे. पेशवाईची राजवट, जी राजवट आपल्या शासन काळात कठोरपणे जातिवाद पाळत होती त्याविरुद्ध महार लोक हा दिवस साजरा करतात हे सर्वश्रुत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महार हे रक्षक होते हा इतिहास आहे. परंतु ज्या पेशवाई आणि मनुवादी व्यवस्थे विरुद्ध महार आणि मराठे लढले आज ते त्यांच्याच वळचणीला गेलेले दिसतात. आजचे अनेक प्रस्थापित मराठे आणि मागासवर्गीय हेडगेवार इत्यादींच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतांना दिसत आहे.
महाराष्ट्र हा महार या शब्दातून आला असल्याचे इतिहासकार संशोधक विश्वास पाटील यांनी त्यांच्या लिखणात मांडले आहे.आणि महार हा इतिहासातील लढवय्या जमात असल्याचे इतिहासकारांनाही नाकारता आलेले नाही आणि याचे जिवंत काही उदाहरणे द्यायची झाली तर असे देता येईल की,लाल महालाची जागा महार समाजाची आहे,तोरणागड हा महार राजाचा होता,संभाजीराजे यांचा बालपणीचा मित्र रायप्पा महार आहे.तर संभाजीराजांना वाचविण्यासाठी अर्जुना महार याचे बलिदान आहे.तर रायप्पा महार यानेही बलिदान दिले आहे.तर छत्रपती संभाजी महाराज यांचा अंत्यसंस्कार गोविंद महाराने केला आहे….तर त्यांच्या हत्येचा बदला सिद्धनाक महार याने घेतला आहे.या सर्व बाबी आर्य सनातनी लोकांनी दुर्लक्षित केल्या नसून त्यावर त्यांनी विचार विनिमय करून धूर्त पध्द्तीत महार लढवय्या संपविण्याचे कटकारस्थान केले.प्रथम पेशवाई निर्माण करून “महार योद्धा” यांना अस्पृश्य महार घोषित करून अठरा अलुतेदारापासून वेगळे करण्यात आले.
खरे तर महार – मराठा एकाच कुळाचे आहेत हे दर्शविण्यासाठी सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे ब्राह्मण हे मराठ्यांनाही शुद्र मानतात हा होय. इतर पुराव्यांचा देखील विचार करता येईल जसे
१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्यभिषेकास ब्राह्मणाद्वारे विरोध करण्याचे मुख्य कारण म्हणजे मनुवादी धर्मानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्र होते. राजर्षी शाहू महाराजांचा ब्राह्मणांद्वारे वेदोक्त प्रकरणामध्ये अपमान करण्याचे मुख्य कारण म्हणजे मनुवादी धर्मानुसार राजर्षी शाहू महाराज हे शुद्र होते.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ही ब्राह्मणांद्वारे वेळोवेळी त्रास देणे, त्यांना अपमानित करणे, त्यांना विरोध करण्याचे मुख्य कारण म्हणजे मनुवादीधर्मानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुध्दा शुद्र होते.
२) महार मराठ्यांचे राहनीमान, त्यांची बोली भाषा, त्यांचे सन, उत्सव, त्यांची कुलदैवतं, त्यांची नावे, त्यांची संस्कृती ही सारखीच आढळून येणं, हे काय दर्शविते.? याचा अर्थ महार मराठा हे एकच होय.
३) ब्राह्मण लोक आजही महार – मराठ्यांची कुंडली सारखीच बनवितो. याचा अर्थ महार – मराठा हे एकच होय. त्या संदर्भातील पुरावा खालीलप्रमाणे
महार –
वर्ण – शुद्र.
गण – राक्षस.
योनी – अंत्यज.
वंश – नाग.
मराठा –
वर्ण – शुद्र.
गण – राक्षस.
योनी – अंत्यज.
वंश – नाग.
याचा अर्थ मनुवादी महार आणि मराठे आजही शुद्रच होय. म्हणून खर तर महार लोकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी पेशवे कधीच पुढे आले नाहीत, उलट त्यांच्या रेजिमेंटमध्ये महार लोकांना भरती करणे हे अपमानास्पद कृत्य आहे, असे त्यांना वाटले. पण इतिहास दाखवतो की ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वाखालील त्याच महार सैनिकांनी पेशव्यांविरुद्ध लढा दिला आणि त्यांना पराभूत केले म्हणजे आपल्याला ब्राह्मणी पेशव्यांवर विजय मिळवलेल्या अत्याचारित लोकांचे शौर्य आणि बुद्धीमत्ता दिसून येते.
विजय स्तंभावर कोरलेल्या ४९ सैनिकांच्या नावांपैकी २२ महार समाजातील आहेत. १ जानेवारी १९२७ रोजी, १०९ व्या वर्धापनदिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला पोहोचले त्यानंतर महार लोकांचे लष्करी कौशल्य ब्रिटिश साम्राज्यासाठी उपयुक्त ठरले, हे त्यांनी गोलमेज परिषदेतील भाषणात नमूद केले, हे लक्षात घेण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी राजकारणाचे जनक आहेत, आणि महाराजांनी औरंगजेब या इस्लामिक सम्राटाविरुद्धच्या, इस्लामिक लोकांविरुद्ध हिंदुत्ववादी राजवट उभी केली आणि असे करणारे ते पहिले राजे आहेत असे चित्र आज राज्यात नव्हे तर देशात निर्माण झाले आहे. परंतु या हिंदुत्ववादी राजकारणात अनेक ऐतिहासिक तथ्य जाणीवपूर्वक नष्ट करून सोयीचा इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि यात महारांचे स्वराज्यातले योगदान जाणीवपूर्वक बाजूला करण्यात येत आहे.
हिंदुत्ववादी राजकारणाच्या विरोधात एक इतिहास आहे जो इतिहास मनुवादी राजकारणा साठी अडचणीचा आहे . मनुवादी व्यवस्थेत महार अस्पृश्य झाले होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अस्पृश्यतेतून मुक्त केले परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यामातून दिलेले समान नागरिकत्व आणि त्यातून निर्माण होणारी राजकिय आणि सामाजिक जागृती मनुवादी व्यवस्थेला नको आहे कारण महारांची अस्मिता आणि त्यांची शिवरायांशि असलेली निष्ठा, त्यांचा पराक्रम त्यातून स्वराज्यातील त्यांचे योगदान समोर आले तर आपले राजकारण संपुष्टात येईल, असे अनेकांना वाटते.
भीमा कोरेगावपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वढू बुद्रुक या गाव, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करणारे शूर गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाध्या आहेत. १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकून दिलेत आणि “कोण तुकडे गोळा करून अंत्यसंस्कार करतो, ते पाहूया?” असा उपहास करत असताना, केवळ एका महार सैनिकाने त्याला तोंड देण्याचे धाडस दाखवले ते होते शूर गोविंद गोपाळ गायकवाड .
बुद्रुक भागातील रहिवासी, त्यांनीच धाडसाने राजेशाही आदेशाचे उल्लंघन केले आणि जाळीचा वापर करून तुकडे गोळा करण्यासाठी नदीत प्रवेश केला आणि ते शिवून विधी पूर्ण केले. औरंगजेबाच्या सैन्याने संभाजी महाराजांना ठार मारले, हा इतिहास आहे. गोविंद गायकवाड यांची समाधी, त्यांच्या शौर्याच्या गौरवासाठी संभाजी महाराजांच्या शेजारी उभारण्यात आली आहे, जी त्यांचा इतिहास आणि ओळख उघड करत आहे परंतु आता ते हिंदुत्ववादी राजकारण आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या श्रीमंत मराठ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला, हिंदू राष्ट्र स्थापन करू पाहणाऱ्या एका हिंदू राजाला ठार मारले आणि संभाजी महाराजांना ठार मारले त्यांच्यावर महार समाजातील व्यक्तीने अंत्यसंस्कार केले, ही वस्तुस्थिती हिंदुत्ववादी राजकारणाच्या विरोधात आणि अत्याचारित लोकांच्या राजकीय उठावाला पाठिंबा देणारी असल्याने ते इतिहासाची पाने जाळत आहेत आणि ते कोणतेही चिन्ह न ठेवता नष्ट करण्याचा विचार करत आहेत. आता याच वस्तुस्थितीच्या दुसर्या बाजूला, संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महाराचा इतिहास उलगडतो . छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसावर महाराने अंत्यसंस्कार केले का? तसे असल्यास, मराठ्यांचे शौर्य कुठे होते? असे प्रश्न वाढू नयेत, यासाठी ते हे पान बदलण्याचा विचार करत आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर अत्याचारित लोकांनी काही कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे काही ऐतिहासिक तथ्ये सादर करतात.
गोविंद गोपाळ यांची संभाजी महाराजांनी नाशिक बंदराचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली होती. वारंवार प्रयत्न करूनही औरंगजेबाचे सैन्य ते काबीज करण्यात अपयशी ठरले. गोविंद महार असल्याने ही घटना दाबून टाकण्यात आली आहे. संभाजी महाराजांचा औरंगजेबाच्या सैन्याने पराभव केला आणि राणी येसूबाई यांनी संभाजी महाराजांचा शोध घेण्यासाठी दोन व्यक्तींची नियुक्ती केली, जेव्हा त्यांचा ठावठिकाणा माहीत नव्हता. हे दोघे महार समाजातील होते, गोविंद गोपाळ आणि रायप्पा महार. दोघेही त्यांचा शोध घेत होते आणि रायप्पा महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने ठार मारले. गोविंद महाराजांना शोधत असताना संभाजी महाराजांच्या नशिबाबद्दल माहिती मिळाली ,संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्याचे धाडस करणाऱ्याला मृत्युदंडाची धमकी प्रशासनाने दिली. गोविंद गोपाळ वगळता कोणीही पुढे आले नाही. गोपाळ त्यांच्या शरीराच्या शोधात गेले आणि नदीतून ते गोळा करून अंत्यसंस्कार केले. हीच माहिती त्यांनी राणीला दिली.
या कृत्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने गोविंद गोपाळ यांच्यासह ५० ते ७० महारांची हत्या केली. गोपाळ यांच्यासह हत्या झालेल्या आत्म्यांसाठी बांधलेल्या समाध्या आजही त्यांच्या कथा सांगत आहेत. हिंदुत्ववादी राजकारणासाठी इतिहास विकृत करणे, आणि चुकीचा अर्थ लावणे हे सिंधू संस्कृतीपासून सुरू आहे . श्री गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होते १९८८ मध्ये प्रकाशित झाल्यापासून छत्रपती शिवाजीराजे हे हिंदू शासक नव्हते तर धर्म निरपेक्ष शासक होते ही त्यांची मांडणी अनेक कट्टर पंथी लोकांना खटकणारी होती ,तशीच ती भीती महारांच्या शौर्याची आणि स्वराज्यातील योगदान पुढे आले तर काय याची आहे. काही घटनांचे बारकाईने निरीक्षण करताना, त्यामागील कारणे आपल्याला घाबरवतात. संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित तथ्ये हेतुपुरस्सरपणे विकृत केली जात आहेत.ते असा प्रतिवाद करतात की मराठा समाजातील शिवळे देशमुख यांनी संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले; पुढे ते ओरडतात की गोविंद गायकवाड यांची समाधी अलीकडच्या काळातच बांधली गेली; आणि गायकवाड यांच्या समाधीशी संबंधित जमिनीची कागदपत्रे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे उपलब्ध नाहीत, असा आरडाओरडा करतात. त्यांनी त्यांच्या समाधीवरील गायकवाड यांचे नाव असलेले फलक काढून टाकले. या सर्वांपेक्षा, ते गायकवाड यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांना शहरी नक्षलवादी म्हणून लेबल लावतात.
भगव्या ध्वजासह दंगलखोरांना सामाजिक रक्षक म्हणून आणि अस्सल आवाजात आपले हक्क व्यक्त करणाऱ्या लोकांना राष्ट्रविरोधी म्हणून चित्रित करण्याचीअलीकडची वृत्ती अविश्वसनीय रित्या लोकां समोर आलेली आहे.
महार समाजाचा शिवकाळ व पेशवाईतील शूरवीरांचा इतिहास आपण तपासला असता आपल्याला दिसते की
1) सातवहान राजवटीत नाव=महारक्ख ते महारक्षक ( महार).
2)मोगलांशी झुंज देवून वैराटगड जिंकणारा= नागनाक महार नागेवाडी वाई सातारा. छत्रपती राजाराम यांनी दिलेले इनाम म्हणजे पाटीलकी नागेवाडी गाव हे वतन म्हणून देण्यात आले.
3) जीवाजी महाराची कामगिरी= प्रतापगडच्या सुभान खान व बेदरच्या अब्दुल शहाचे बंड शमवले. बंगालच्या वाघास पिंजर्यात बंद करून आणले(आठ परगण्याची सरनाईक की)म्हणून बक्षीस दिले.
4) वाल्हे येथील महारांची कामगिरी= श्री शिवाजी महाराजांची कन्या सखुबाई एकदा संकट कोसळले असता तिचे रक्षण केले.
5) रायनाक महार= दुसर्या बाजीरावाच्या काळात रायगड किल्ल्याचा किल्लेदार (इंग्रजांशी लढताना ठार).
6) सिद्धनाक पहिला= बहमनी राज्याचे सेनापती होते.
7) सिद्धनाक महाराचा नातू तिसरा (सिदनाक महार उर्फ सिद्धनाक बाजी हा होय)= छत्रपती शिवाजी महाराजांना वाई प्रांतात लष्करी मदत, जावळीच्या चंद्रराव मोरया’च्या पाडव करण्यास मदत.
8) सिद्धनाक 3रा उर्फ सिद्धनाक बाजी=अफजल खानाच्या वधानंतर प्रताप गडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत मोठा पराक्रम दाखवला.
9) तिसऱ्या सिद्धनाक याचा मुलगा कृष्णनाक महार= वाई प्रांतात मराठा व मोगल लढाईत ठार झाला.
10) पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार= चीव्हे नाईक (महार) रा. ठी.अवसरी ता. पुरंदर जि.पुणे.
11) प्रत्येक किल्ल्यावरील मेटनाइकी=त्यात महार समाजाचा भरणा जास्त होता.
12) सातारा किल्ला मेटनाइकी=महादनाक कलद राजनाक महार यांचेकडे होते.
13) महार समाजाची लष्करी पथके= हुलस्वार पथक, पायदळ, किल्लेदार मेटनाइकी, अंगरक्षक.
14) शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे भगवे निशान तयार करून देणार, सातारा सदाशिव पेट ढाले पणाचे वतन देण्यात आले=महादनाक सरदार.
15) छत्रपती शाहू यांस सातारच्या गादीवर बसविण्यास मदत= सिद्धनाक महार तिसरा कळम (कळकी) हे गाव इनाम (वतन) देण्यात आले.
16) सण 1659 साली बाजी पासलकर यांनी शौर्य गाजवून सिधीचा तालिबानी राजवटीचा पराभव केला त्यांचा अंगरक्षक=खंड्या महार ( अंगरक्षक)
17) वसईच्या रणसंग्राम महारांची कामगिरी (युद्धाचे सामान पाण्यातून युद्धाचे ठिकाणी पोहोचवण्याचे अवघड काम केले)= तुकनाक महार याने मांडवी कडील मोर्चा संभाळून टक्कर दिली त्यावेळी त्याचा गौरव करण्यात आला, सोन्याचे कडे बक्षीस देण्यात आले.
18) खरड्याची लढाई व सिद्धनाक महार चौथा (शेवटचा) सरदार-परशुरामभाऊ पटवर्धन यांचे प्राण वाचविले =मराठे व निजाम 11मार्च
1715 रोजी आपल्या पथकासह लढाईत शौर्य दाखवले यात निजामचा पराभव झाला.
19) रायप्पा महार= लाखोंच्या फौजेत घुसून शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न रायप्पा महार यांनी केला व स्वतःचे बलिदान दिले.
20) धोंडनाक सरदार=(कोंडाणा किल्ल्यावरील ‘महार’ वीरांची कर्तबगारी)= मुघलांच्या ताब्यातील कोंडाणा किल्ला सण 6 फेब्रुवारी 1670 घनघोर लढाईत सहभाग.
21) मिरज जवळील कळंबीचे सिद्धनाक सरदार= सण 1761 साली तिसऱ्या पानिपतच्या लढाईत होते आणि त्यांना शुरवीर मरण आले( मिरज इतिहास संशोधन मंडळ) (इतिहासकार – मानसिंग कुमठेकर सांगली) व हुलस्वार पथकासह सहभागी झाले होते.
22) विठू (महार)= आदिलशहाच्या कैदेत असलेले दामाजी पंत यांची सुटका करून त्याच्या मोबदल्यात सोन्याच्या मोहरा विठू महार यांनी दिल्या.
23) रामा म्हसू महार -पन्हाळा (मसाई पठार)ते विशाळगड शिवाजी राजांना वाट दाखवणारे महारांचे म्होरके पन्हाळ गडाच्या पायथ्यशी त्यांचं गाव नंतर राजांनी त्यांची पन्हाळगडाचा सारा गोळा करण्यासाठी नेमणूक केली .
24)गोविंद गोपाळ महार= वडू बुदृक भिमा कोरेगाव येथे संभाजी महाराजांची समाधी बांधण्यास जागा दिली व महार वाड्यात छत्रपती शाहू महाराज यांनी समाधीस बांधल्या बद्दल त्यांना सनद देऊन जमीन ईनाम म्हणून देण्यात आली.
25)नागनाक सरदार= मुघलांच्या ताब्यात असलेला वैराटगड जिंकून स्वराज्यात सामील केला. छत्रपती राजाराम यांनी वैराट गड जिंकून दिल्याबद्दल नागनाक यास नागेवाडी हे गाव इनाम म्हणून देण्यात आले व पाटील की बक्षीस देण्यात आली.
हा दैदीप्यमान इतिहास बघितला की साहजिकच आपल्या समोर मुद्दा येतो की स्वराज्यात महार लोकांचे योगदान काय आहे? तर त्याचे अनेक पुरावे खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.
स्वराज्याचा आधारस्तंभ असलेला छ. शिवाजी महाराजांचा हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक याला सर्व गुप्त माहिती व बातम्या त्याचे विश्वासू ‘महार’ साथीदार पुरवत असत….”
(जेम्स ग्राण्ड डफ – ‘हिस्ट्री ऑफ दि मराठा’ . ‘महार रेजिमेंटचा इतिहास ,पृष्ठ-७)
“शत्रूस हुलकावणी देऊन भ्रमित करुन त्यास भलतीकडेच नेऊन अगदी शत्रू सैन्याची दमछाक करण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या ‘ हूळ (हूल)पथका’त असलेले सर्व सैनिक हे फक्त महारच असत… ”
( मेजर आर. एन. बेहतम – महार रेजिमेंटचा इतिहास, संपादक- बलभद्र तिवारी, प्रकाशक- ब्रिगेडियर ईश्वरदत्त.)
” महारांनी छ. शिवाजी महाराजांच्या बरोबर राहून आणि नंतर कान्होजी आंग्रेच्या नेतृत्वाखाली समुद्रातील युद्धात जे पारंगत्व मिळवले, त्यामुळे ते ‘मरिन बटालियन’चा फार मोठा भाग बनले. त्याचबरोबरीने मैदानी युद्धातही बहादुरीने लढून ,लौकिक प्राप्त करुन त्यांनी अनेक पुरस्कार तर प्राप्त केलेच, शिवाय सैनिकी सेवेत आपल्या इमानदारीने व पराक्रमाने अनेक उच्च विक्रमही स्थापित केले….”
( महार रेजिमेंटचा इतिहास -पृ. १५.)
पुरंदरच्या सर दरवाजावरील ढालीचे संरक्षण ( ढाल म्हणजे निशाण, झेंडा ) व बालेकिल्ल्याच्या घेऱ्याची महत्त्वाची व मानाची जबाबदारी तिथल्या ‘बेंगळे’ आडनावाच्या महारांवर सोपवलेली होती…..”
( शिवचरित्र साहित्य -लेख ९२, पृ.१११-११२.)
पुरंदरच्या युद्धात दिलेरखानाने सोडलेल्या बाणाने कंठाचा वेध घेतला जाऊन किल्लेदार मुरारबाजी धारातीर्थी पडला, तेव्हा सरदरवाजावरील ढालीचे व बालेकिल्ल्याचे संरक्षण करणारे महार सैनिक मिशीवर पिळ देत गरजले “एक मुरारबाजी पडला तरी काय जाहले ? आम्हीही तैसेच शूर आहोत. ऐसी हिंमत धरून भांडतो…”
( राजा शिवछत्रपती – ले.बाबासाहेब पुरंदरे. )
” इतकेच काय पण शिवाजी राजे यांचे अवतार समाप्त जाहले. नारोशंकर लहान संभाजी महाराजे धरून नेले. मागे धनी कोणी नाही, राजीक फार जाले. मुलूख उजेड जाला. किल्ल्यावरील लोक नामजाद होते ते उठोन गेले. त्रिंबक सिवदेव सचीवाचे मामा त्यास पुरंधरी ठेवले. पैसा मिलेना लोक मिलेनात गडेवरीत गस्त चालीली पाहिजे व सदरेस वेढा पाहिजे या करिता बेगले महार गढावरील आणून संताजी बतदल येलदेकर याला नाईकी पहिलेच होती अलग होती ते जागा महारास देवून गडावरी ठेविले. गस्तीची चूड धरावी व सदरेस वेढा आणून द्यावा गस्तीच्या आसाम्या व वेढेकराची असामी करुन दिली. कोणी कोणी किल्यावर नव्हते. या प्रती ते त्रिंबक सिवदेव होते तो चालीले त्याचा काल जाला ते गेले…
(शिवचरित्र साहित्य- सं. शंकर नारायण जोशी. इ. स. १९३०. पृ. १७, खंड ३रा भा. इ. सं. मंडळ, पुणे.)
” पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेलेला कोंढाणा किल्ला किल्लेदार उदयभानू कडून जिंकूण पुन्हा स्वराज्यात सामील करण्यासाठी तान्हाजी मालुसरे यास कोंढाणा किल्याच्या चोरवाटा, चौकी पहाऱ्याच्या जागा व किल्यावर असलेल्या शिबंदीची खडानखडा बातमी रायाजी घेरे सरनाईक, गोंदनाक महार, मल्हारबा, राणबा, शिदबा महार इ. महारांनीच पुरविली व यशवंता महार हा अवघड कडा घोरपडीसारखा सरसर चढून वर गेला व तेथील बहाव्याच्या झाडाला दोर बांधून तो त्याने तानाजी व त्याच्या सैन्यासाठी खाली सोडला…..”
( ‘गड आला पण सिंह गेला’ – ले. ह. ना. आपटे. पृ. ७१, ८८, ९४. ‘झुंजारमाची’ – ले. गो.नी.दांडेकर. ‘हरहर महादेव’- ले. गो. नी. दांडेकर, पृ. २३९-२४०.’ सप्त प्रकरणात्मक चरित्र – पृ. ७८. ‘चित्रगुप्त बखर’- पृ. ७६, ‘शेडगांवकर बखर’- पृ. ५८.’ शनिवार वाडा, सिंहगड’ ले- गणेश हरी खरे, पृ.१४.)
” छ.संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडविण्याचा शेवटचा सशस्त्र प्रयत्न रायाप्पा महार याने केला. त्या प्रयत्नात रायाप्पा यास आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. त्यानंतर झालेल्या संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर संभाजी महारांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करुन , स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करणारा शूरवीर गोविंदनाक गोपाळनाक हा महार होता. औरंगजेबाच्या ४०,०००बलाढ्य फौजेला अवघ्या ६०० सैनिकांच्या तुटपुंज्या शिबंदीनिशी रामसेज किल्ला सतत सहा वर्षे झुंजवत ठेवणारा रामसेजचा शूर किल्लेदार हाच गोविंद गोपाळ महार होता….”
( ‘संभाजी’- ले. विश्वास पाटील, पृ. ७५६ ते ७६२ आणि ८२२ते ८२८.’ शिवकालीन महार योद्धे – रायाप्पा व गोविंदा महार यांचे चरित्र ‘ ले. सिधाप्पा मोरे, बेळगांव. प्रकाशक – प्रबोधनकार ठाकरे. इ.स. १९६७.)
” बेदर किल्ल्याच्या तटाचे बांधकाम चालू असतांना ते वारंवार ढासळू लागले . त्यावेळी ते ढासळू नये म्हणून तटबंदीच्या पायात येसनाक महार याने आपला मुलगा व सून यांचा बळी दिला, तर सेंदऱ्या बुरुजाच्या पायात बहिरनाक सोननाक महार याने आपला जेष्ठ मुलगा नाथनाक व सून देवकाबाई यांना अश्विन वद्य अष्टमीच्या दिवशी , भर दुपारी जीवंतच पुरले….”
( ‘राजा शिवछत्रपती’.- ले.बाबासाहेब पुरंदरे, ‘अस्पृश्यतेचा प्रश्न ‘ -ले.वि. रा. शिंदे.)
” मोगल बादशहा औरंगजेबाने आपल्या शहजादीचे संरक्षक म्हणून पन्हाळ्याच्या महारांवर ही जबाबदारी सोपवून त्याबद्दल त्यांना पन्हाळ्याच्या आसपास काही जमीन इनाम दिली होती…..”
(‘महार रेजिमेंटचा इतिहास’ – पृ. ५, सं. बलभद्र तिवारी, प्रकाशक-ब्रिगेडियर ईश्वरदत्त.)
” १७३८ साली नागेवाडीच्या कोंडनाक महार या सरदाराने जंजिऱ्याच्या युद्धात मोठा पराक्रम केला. त्याची हिंमत व रणकौशल्य पाहून थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भारावून जाऊन कोंडनाकास मिठी मारली व आपल्या गळ्यातील सोन्याचा कंठा स्वतःच्या हाताने त्याच्या गळ्यात घातला…..”
( ‘क्रांतीवीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘- पृ.१२,१३. ले. भाऊ लोखंडे.) ”
१७३९ च्या वसईच्या मोहीमेत किल्ल्याच्या तटावरून सततच्या होणाऱ्या बंदुकीच्या माऱ्याला न जुमानता तटास भिडून शिड्या लावून किल्यावरील पोर्तुगीजांचा ध्वज काढून, तिथे मराठ्यांचा भगवा फडकावण्याचे जिगरबाज काम तुकनाक महाराने केले. यात त्याला सीता महार, फकीरा महार, वीरा महार, यमा महार, हंसा महार या महार शूरवीरांनी मदत केली…..”
( ‘महार-मांग संबंध’, पृ.६९, ले. प्रा. वी. सी. सोमवंशी.)
” मध्यप्रदेशातील ‘श्रीवर्मा’ नावाच्या राजाचा ‘सत्यपाल’ नावाचा महार सेनापती होता…..”
( ‘ क्रांतीवीर डॉ. आंबेडकर’ – पृ.१३ ले. भाऊ लोखंडे.)
” बहमनी , निजामशाही , आदिलशाही सल्तनतीत, तसेच, मोगल बादशहा व छ. शिवाजी, संभाजी, राजाराम व ताराबाई यांच्याही काळात महारांना किल्लेदार म्हणून नेमणुका मिळाल्या होत्या. ‘वाकणगिरी’ या किल्याचा आदिलशाही किल्लेदार पामनाक व त्याचा भाऊ रामनाक हे महारच होते…..”
( ‘ अस्मिता दर्शन ‘ पृ. ६४,६५ . अंक ८०.)
“मराठ्यांनी मिळवलेला शेवटचा विजय म्हणून इतिहासात ज्या खर्ड्याच्या लढाईची नोंद आहे, तो खर्ड्याच्या लढाईतील विजय पेशव्यांना सांगली जिल्ह्यातील ‘कळंबी’ या गावच्या ‘शिदनाक’ नावाच्या शूर महार सरदारानेच मिळवून दिला होता……”
(‘खर्ड्याच्या स्वारीची बखर’.)
अजून बरेच काही आहे ज्याची नोंद विविध साहित्यात कागदपत्रात मिळते





