अकोला : राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोल्यातील ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची अकोट तालुक्यातील मोहाळा या त्यांच्या मूळ गावी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दुःख व्यक्त केले असून, श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास गावातील मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या उबेद पटेल नावाच्या तरुणाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. उबेदने पटेल यांच्या पोटात आणि मानेवर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पटेल यांना तातडीने अकोट येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोल्यात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.
या हत्येमागे जुने राजकीय वैमनस्य आणि सूडाची भावना असल्याचे बोलले जात आहे.
२४ मे २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती.
आजचा हल्लेखोर उबेद पटेल हा मृत मतीन पटेल यांचा पुतण्या आहे. २०१९ च्या त्या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह १० जणांवर गुन्हे दाखल होते. काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच उबेदने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वाहिली श्रद्धांजली
हिदायत पटेल यांच्या निधनाची बातमी समजताच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ‘X’ (ट्विटर) हँडलवरून ट्विट करत पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.






