मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत काँग्रेसला मोदींच्या पराभवाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘बिहारमधील दलित विभागाच्या मतदारांचा अभिप्राय असा आहे की जर महागठबंधनला मोदींचा पराभव करायचा असेल तर काँग्रेसने बिहारमध्ये 5 पेक्षा जास्त जागा लढवू नयेत. 2019 मध्ये काँग्रेसने ने 9 जागा लढवल्या आणि फक्त 1 जिंकली. 2020 च्या बिहार विधानसभेत काँग्रेसने ने 70 जागा मागितल्या, ज्या लालूंच्या नेतृत्वाखालील RJD ने त्यांना दिल्या पण काँग्रेस फक्त 19 जागा जिंकू शकली.
देशाच्या हितासाठी, 40 लोकसभेचे खासदार निवडून देणाऱ्या बिहार मध्ये काँग्रेसने जास्तीत जास्त 5 जागा लढवल्या पाहिजेत. काँग्रेसने आता “मोठा भाऊ” असण्याचा ॲटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावे.’ लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी मोदींचा पराभव करणे आवश्यक असल्याची भूमिका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा मांडली आहे. काँग्रेस आंबेडकरांच्या या आवाहनाला कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.