नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला आहे. महादुला शहरात झालेल्या एका कार्यक्रमात भाजप पक्षाला रामराम ठोकत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे परिसरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा पक्ष प्रवेश सोहळा यशवंत लॉन, कामठी येथे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हामहासचिव सी.सी. वासे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना आदराने अभिवादन करून, दीप प्रज्वलन व पुष्प अर्पण करून झाली. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांचा जाहीर सत्कारही कार्यकर्त्यांनी केला.
या सोहळ्यात अनेक भाजप कार्यकर्त्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघातच हा भाजपच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने केला आहे. यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये कार्यालयीन सचिव इंजि. वैभव येवले, आय.टी. सेल प्रमुख इंजि. शुभम वाहने आणि सरजू इंगळे यांचा समावेश होता. यासोबतच राजेश्वरी गडपायले, शोभा वासे, मीना कापसे, पी.एन. कडबे, भगवान सोनवणे, लक्ष्मीकांत सोनटक्के, जोगेंद्र दुपारे, अमोल बोंबार्डे, अनिकेत सोनवणे, बाला गायकवाड, ईश्वरी लाल भिमगडे, एल.जी. रंगारी, एम.सी. सोनारे, कैलास माटे, प्रफुल मेश्राम, तुषार साळवे, राजू इंगळे, नितेश साळवे, बबन पाईकराव, मनोज निकोसे, प्रदीप काळे, जिया खान, आशिष मेश्राम आणि नीलकमल बोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.