बिहार : बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून माणुसकी आणि प्रशासकीय व्यवस्थेला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. गरौल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोंधो मुबारकपूर मांझी टोला येथे एका ९१ वर्षीय झपकी देवी यांच्या निधनानंतर कुटुंबाला स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही.
सार्वजनिक मार्गावर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नातेवाईकांना पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. यावेळी नातेवाईकांनी बराच प्रयत्न केला. तसेच वाद होऊनही रस्ता न मिळाल्याने, हताश झालेल्या नातेवाईकांनी अखेर रस्त्याच्या चौकातच चिता रचून अंत्यसंस्कार केले.
बिहारच्या वैशालीमध्ये ९१ वर्षीय झपकी देवी ह्या महादलित समुदायातील होत्या. मात्र त्यांच्या पार्थिवाला स्मशानापर्यंत नेण्यासाठी रस्ताही उपलब्ध करून देण्यात आले नाही. यावेळी पोलीस-प्रशासनाची गाडी घटनास्थळी पोहोचली खरी, पण व्यवस्था आणि संवेदनशीलता दोन्ही गायब होत्या. परिस्थिती इतकी अमानवीय होती की, नातेवाईकांना नाईलाजाने रस्त्याच्या भर चौकातच अंत्यसंस्कार करावे लागले.
हा प्रश्न केवळ झपकी देवी यांचा नाही, तर त्या व्यवस्थेचा आहे जी समानतेच्या गप्पा तर मारते, पण जमिनीवर माणुसकीचा रस्ता देखील बनवू शकत नाही.
“रस्त्याच्या मध्यभागी धधकणारी ही चिता प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, हा रस्ता बऱ्याच काळापासून बंद आहे आणि तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. संदेश माझी (मृतकाच्या मुलाने) सांगितले की, ‘जेव्हा आम्हाला स्मशानात जाण्यासाठी रस्ताच दिला गेला नाही, तेव्हा आमच्याकडे दुसरा पर्याय दिसला नाही, आम्ही हतबल होऊन रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले.






