पुणे : शौर्य दिनाच्या निमित्ताने आज १ जानेवारी २०२६ रोजी ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथे लाखो अनुयायांचा जनसागर लोटला आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दाखल झाले असून संपूर्ण परिसर घोषणांनी दुमडून गेलाय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट देऊन ५०० शूरवीरांना मानवंदना दिली.

“हा लढा नव्या भारताच्या पर्वाची सुरुवात” – एड. प्रकाश आंबेडकर
विजयस्तंभाजवळ उपस्थितांना संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “भीमा कोरेगावचा इतिहास हा देशातील मानवतेचा इतिहास आहे. ही लढाई तत्कालीन जाती व्यवस्थेविरुद्धचा एक मोठा संघर्ष होता. हा लढा जिंकला गेला आणि तिथूनच एका ‘नव्या भारताच्या’ पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.”

ते पुढे म्हणाले की, या विजयानंतर भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली असली, तरी त्यासोबतच एका नवीन विचारसरणीचा उदय झाला, ज्याने आधुनिक भारताच्या उभारणीचा पाया घातला. हा लढा केवळ लष्करी विजय नसून तो आत्मसन्मान आणि सामाजिक समतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनुयायांची मोठी उपस्थिती :
या सोहळ्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि लाखो भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने विजयस्तंभाला अभिवादन केले.

प्रशासकीय यंत्रणा आणि कडेकोट सुरक्षा :
गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा (रुग्णवाहिका) आणि फिरती शौचालये यांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचसोबत अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियोजन करण्यात आलय.





