पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि वडार समाजाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे पुण्यात भव्य सत्कार करण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशी यांना रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या लढ्यात न्याय मिळवून दिल्याबद्दल हा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार समारंभात बोलताना शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “माझा विश्वास फक्त बाळासाहेब आंबेडकरांवर आहे, कारण तेच आपल्याला न्याय देऊ शकतात.”त्यांनी सरकारवर आणि काही प्रमुख नेत्यांवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सर्व खोटे आहेत
“हे सरकार गरिबांचे नाहीये, फक्त श्रीमंतांचे आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सर्व खोटे आहेत,” असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करताना त्या म्हणाल्या, “एका गुराख्याला ज्ञान आहे, पण देवेंद्र फडणवीसला नाही. अजूनपर्यंत फडणवीस परभणीला का आले नाहीत? मुंबईत बसून त्यांनी माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला.”
राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका
यासोबतच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे आमच्याकडे आले आणि न्याय देण्याचे आश्वासन दिले, पण त्यानंतर कोणाचाही फोन आला नाही.”
या सत्कार समारंभाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आणि वडार समाजाचे नेते अनिल जाधव प्रमुख उपस्थित होते. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. अनिल नारायण जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला.