पिंपरी-चिंचवड: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची सोशल मीडियावर अपशब्द वापरून बदनामी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. ‘वर्धा लाईव्ह’ आणि ‘राजकारण विदर्भाचे देवा भाऊ समर्थक’ या फेसबुक पेजवरून ही बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर फेसबुक पेजवरून बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत अर्वाच्य आणि अपमानास्पद शब्द वापरण्यात आले आहेत. तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे की, समाजात त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या दुष्ट हेतूने हे कृत्य करण्यात आले आहे. यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला असून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी
या गंभीर प्रकारानंतर कार्यकर्त्यांनी त्वरित सदर पेजवरील आक्षेपार्ह व्हिडिओ बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच, ‘वर्धा लाईव्ह’ या फेसबुक पेजच्या ॲडमिनवर किंवा संबंधित व्यक्तींवर त्वरित गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे.
 
			

 
							




