पुण्यातील पत्रकार परिषदेत मुन्नवर कुरेशींचे आवाहन
पुणे: पुण्यातील सर्व फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या नागरिकांनी आणि आरक्षण वादी विचारांच्या संघटनानी मोठ्या संख्येने सत्ता परिवर्तन महासभेला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी केले आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग, संतोष संखद, अनिता चव्हाण, प्रफुल्ल गुजर आणि सुनिल धेंडे आदी उपस्थित होते.
आज सर्व नागरिकांसमोर मोठा प्रश्न आहे, देशाच संविधान आणि लोकशाही वाचवायची, यासाठी सत्ता परिवर्तन करणं गरजेचं असल्याचे परखड मत मुन्नवर कुरेशी यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना कुरेशी म्हणाले, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांच आंदोलन चिरडल्या जात आहे. विद्यार्थी आणि युवक यांच्या मुलभूत अधिकारांवर दडपशाही करण्यात येत आहे. विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. तर युवक नोकऱ्यांसाठी वनवन फिरत आहे. तसेच, कोट्यांवधी नोकऱ्या देऊ असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, 2014 मध्ये नोकऱ्यांचा आलेख खाली आला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कुरेशी म्हणाले, जीएसटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. धार्मिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसामार्फत दबाव टाकण्यात येत आहे. राजकीय पक्षांची काय अवस्था झाली आहे. हे वेगळ सांगायला नको. तसेच, गुन्हेगारीने अंतिम सीमा गाठली असून पोलिस स्टेशनमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार होत आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर ही सध्याची सत्ता आपल्या फायद्याची नाही, असं तुम्हाला वाटत असल्यास वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यासाठी एकच पर्याय आणि उत्तर आहे.
कारण, आंबेडकरांची धोरणं, नियोजन सर्व वंचितांच्या बाजूने आहे. समाजातील ज्या वर्गाचा आवाज दाबल्या जात आहे, त्यांचा आवाज बनून त्यांना राजकारणात हिस्सा मिळवून देणे हेच वंचित बहुजन आघाडीचे ध्येय आहे. त्यासाठीच त्यांनी समाजातील तळागाळाच्या लोकांना एकत्र घेऊन, वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या या ध्येयामागे लाखो लोक उभं असून त्याची प्रचिती प्रत्येक सभेत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पुण्यातही सर्व जाती धर्माचे लोक, सर्व संघटना यांनी 27 फ्रेबुवारीला होऊ घातलेल्या सत्ता परिवर्तन महासभेला उपस्थित राहावे, अशी विनंती कुरेशी यांनी केली.